कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई होणार व.पो.नि. रवींद्र दौंडकर यांचा इशारा..
                                                          
पनवेल : वार्ताहर   :- कोविड- १९चे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे.तसेच या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेऊन सर्तक राहावे. यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नियमांचे पालन करावे. यामध्ये लग्न समारंभाची मंगल कार्यालये, हळदी समारंभ, साखडपुडा, जिमखाना/क्लब, नाइट क्लब, उपहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मिय स्थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक असून, मास्कचा वापर होत नसल्याचे आढळल्यास आणि ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तींना दंड करण्यासोबत त्या-त्या ठिकाणच्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. 

लग्नसोहळ्याचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करून तिथे कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले असेल, तर दंडात्मक कारवाई करून लग्नाचे आयोजक-पालक तसेच संबंधित व्यवस्थापनांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात येतील, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी स्पष्ट केले आहे.
मास्क लावणे, सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) राखणे आणि हात सतत धुणे या त्रिसूत्रीचा वापर करून नागरिकांनी कोरोनाला स्वत:सह कुटुंबीयांपासून दूर ठेवावे, असे आवाहनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर यांनी केले आहे.
Comments