गाड्या भाड्याने लावण्याच्या बोलीवर परस्पर गाडीची विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल, सुमारे ३१ लाख ५०,००० हजारांची फसवणूक

पनवेल दि.०७ (वार्ताहर): तुमची चार चाकी गाडी भाड्याने लावून देतो असे सांगून व त्या बदल्यात तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम देण्यात येईल असे आश्वासन देऊन त्यानंतर आपापसात संगनमत करून भाड्याने लावण्यास दिलेल्या गाड्या परस्पर विक्री करणाऱ्या चौकडी विरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौकडीने आत्तापर्यंत जवळपास 31, 50, 000 रूपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.          

ज्ञानेश्वर पेढेकर (रा.-डेरवली) यांनी आरोपी राजशेखर चिक्के गौडा यास त्यांच्या मालकीची एर्टीगा गाडी हि 18 हजार रूपयेे महिना भाडे तत्वावर रितसर भाडे करारनाम्याची नोंदणी करून सोपवली असता सदर आरोपीने स्वतःच्या फायद्या करीता पि सिस्टीम या नावाच्या कंपनीस भाड्याने दिली असल्याचे सांगून सदर गाडीचे साडे तीन महिन्यांचे भाडे थकवून सदर गाडी त्यांना परत दिली नाही. त्याचप्रमाणे पेढेकर यांच्या ओळखीचे मित्र यांनीही अशाच प्रकारे सूरज पाटील, मुस्तफा व जगदीश चौधरी यांच्याकडे गाड्या दिल्या आहेत. या चौकडीने आपापसात संगनमत करूनभाड्याने लावण्यास दिलेल्या गाड्या परस्पर विक्री केल्याने त्यांच्या विरूद्ध पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
Comments