वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती वाहने विकणारी टोळी गुन्हे शाखेने केली गजाआड..
 ७ कोटी १५ लाख रुपये किंमतीच्या १५१ गाड्या हस्तगत

पनवेल, दि.३ (संजय कदम) :- बीएस-4 च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री-बंदी असतानाही सदर वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणार्‍या ९ जणांच्या टोळीला गुन्हे मध्यवर्ती शाखेने गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास ७ कोटी १५ लाख रुपये किंमतीच्या १५१ गाड्या हस्तगत केल्या आहेत. 

या टोळीने बनावट चेसीस नंबर तयार करण्यासाठी वापरलेली मशीन, गाड्यांचे व्यवहार, नोंदणी, विक्रीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्याकरिता वापरलेले लॅपटॉप, प्रिन्टर, स्टॅम्प पेपर, रबरी शिक्के, बनावट इन्वाईस, मोबाईल फोन इत्यादी मुद्देमाल या टोळीकडून हस्तगत आले आहे.  बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होत असल्याने भारत सरकारने वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मार्च २०२० पासून बीएस-४ इंजिन असेलल्या वाहनांना बंदी घातली आहे. शासनाने बंदी केलेल्या मारुती कंपनीच्या सियाज, ब्रिझा, सेलेरीओ, वॅगनार, इको,बलेनो,एस क्रॉस, अशा वेगवेगळ्या मॉडेलच्या कार पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्यामुळे सदर कार मारुती कंपनीने भंगार म्हणून लिलावात काढल्या होत्या. यातील ४०७ कार चेंबुर येथील ऑटोमोटीव्ह मॅन्युफ्रॅक्चर्रस प्रा.लि. या कंपनीने भंगार म्हणून लिलावात विकत घेतल्या होत्या. मारुती कंपनी सदर कार ताब्यात देण्यापुर्वी सर्व कारच्या चेसीस नंबर कट करुन आरोपी आनम अस्लम सिद्धीकी (४२) याच्या ताब्यात पॅप करण्यासाठी दिल्या होत्या.  मात्र आनम सिद्धीकी व त्याच्या इतर साथीदारांनी सदरच्या कार पॅपमध्ये न काढता त्या कारवर पुन्हा बनावट चेसीस नंबर टाकले. तसेच जुन्या रजिस्टर झालेल्या गाड्यांचे  इंजिन नंबर व चेसीस नंबरचे बनावट व खोटे कागदपत्र तयार केले. त्यानंतर या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सदर कारचे वेगवेगळ्या राज्यातील आरटीओ कार्यालयात वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावाने नोंदणी देखील केली. त्यानंतर या टोळीने पनवेलच्या शिरढोण भागात कार्यालय थाटून सदर कार पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे ग्राहकांना खोटे सांगून या कारची २ ते ३ लाखांमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली. तसेच अनेकांकडून या टोळीने रोख रक्कम देखील स्विकारली. याबाबतची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल व त्यांच्या पथकाने पनवेलजवळील शिरढोण येथील कार्यालयावर छापा मारुन यातील काही आरोपींना अटक केली होती.  
त्यावेळी पोलिसांना बनावट कागदपत्रे व इतर साहित्य मिळून आले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा अधीक तपास केल्यानंतर पॅप करण्यासाठी देण्यात आलेली वाहने ते बनावट कागदपत्रांद्वारे विकत असल्याचे आढळुन आले. त्यानंतर मध्यवर्ती कक्षातील पथकाने महाराष्ट्रातील विविध जिल्हे, दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यात या टोळीने विकलेल्या तब्बल सात कोटी पंधरा लाख रुपये किंमतीच्या १५१ कार हस्तगत केल्या. या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारे हिमाचल प्रदेश व अरुणाचल प्रदेश आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशन केलेल्या ५ कार देखील हस्तगत केल्या आहेत.  या गुह्याचे तपासामध्ये आरोपी इम्रान युसूफभाई चोपडा (३८) याने सदर कारवर नवीन चेसीस नंबर टाकण्याकरिता औरंगाबाद येथून कॉम्फ्युटराईज मशिन खरेदी केल्याचे आढळुन आले आहे. तसेच सदर मशिनद्वारे त्याने इतर आरोपींकडील काही गाड्यांना  बनावट चेसीस नंबर तयार करुन त्याद्वारे आरटीओ नोंदणी केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. सदरची मशिन हस्तगत करण्यात आले असून या आरोपींनी सदर गाड्यांचे  व्यवहार, नोंदणी, पीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्याकरिता वापरलेले लॅपटॉप, प्रिन्टर, स्टॅम्प पेपर, रबरी शिक्के, बनावट इन्वाईस, मोबाईल फोन इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली. या टोळीने अशा प्रकारे विकलेल्या इतर वाहनांचा शोध घेण्यात येत असल्याचे देखील सिंह यांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी आनम असलम सिद्धीकी (42), शाबान रफिक कुरेशी (32), मनोहरप्रसाद व्यंकटराव जाधव (31), वसीम मोहम्मद उमर शेख (31) या चौघांना पनवेल येथून अटक केली. त्यानंतर गौरव सुभाषचंद्र देम्बला (32) आणि प्रशांत एस.नरसय्या शिवरार्थी (26) या दोघांना दिल्ली व हैद्राबाद येथून तसेच राशीद खान अहमद खान (42),चंद्रशेखर ज्ञानदेव गाडेकर (31) या दोघांना पनवेल मधून तर इमरान युसूफभाई चोपडा (38) याला गुजरात मधील अहमदाबाद येथून अटक केली आहे.

Comments