वैभव गायकर "आदर्श पत्रकार" पुरस्काराने सन्मानित...अलिबाग मध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव .

अलिबाग :- सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळण्याच्या भूमिकेतून पनवेलमध्ये अनेक वर्षे पत्रकारिता करणारे पत्रकार वैभव गायकर यांना रायगड प्रेस क्लबकडून दिला जाणारा रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पर्यटनविकास मंत्री रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपुर्वक देण्यात आला. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, रायगड जिल्हा प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आदी उपस्थित होते.

बारा वर्षांपुर्वी रामप्रहर वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरूवात करून वैभव गायकर यांनी पुढारी वृत्तपत्रात देखील खारघर वार्तांहर म्हणून काम केले. मागील अनेक वर्षांपासून ते लोकमत या नामांकित वृत्तपत्रात पनवेल तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. पनवेल महापालिका, सिडको आदीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न गायकर यांनी केला आहे. तटस्थपणे पत्रकारिता करीत अनेक प्रश्न त्यांनी पत्रकारितेतून मांडले. वेळोवेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातही लेखणीचा वापर सकारात्मक हेतूने वापरून चुकीवर बोट ठेवण्याचे काम केले आहे. १२ वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या पत्रकारितेची दखल जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या पत्रकार संघटनेने घेवून त्यांना रायगड जिल्हा श्रमिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

रायगड प्रेस क्लबच्या पंधराव्या वर्धांपनदिनाच्या कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. पनवेल तालुक्यातून त्यांची जिल्ह्याच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पनवेल तालुका नव्हे तर जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. पनवेल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments