फरार झालेल्या बोगस प्रांत अधिकार्याचा पोलिसांकडून शोध सुरु
पनवेल दि.१६ (वार्ताहर): पुण्यातील निगडी येथे प्रांत अधिकारी असल्याचे भासवून एका भामटयाने पनवेल भागात राहणार्या २५ वर्षीय सुशिक्षीत तरुणीसोबत दुसरा विवाह करुन लग्नासाठी तरुणीच्या आई-वडिलांना लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यास भाग पाडून तरुणीची व तिच्या कुटुंबियांची फसवणूक करुन पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. तुषार मारुती थिगळे (३२) असे या भामटयाचे नाव असून त्याने सदर तरुणीच्या भावाला रेल्वेत नोकरीला लावण्याचे तसेच इतर नातेवाईकांना लिलावात निघणार्या गाडया कमी किंमतीत मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून सुमारे २ लाख रुपये उकळल्याचे देखील उघडकिस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या भामटया विरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील तक्रारदार तरुणी सध्या पनवेल भागात राहाण्यास असून २०१२ पूर्वी ती कुटुंबासह जुईनगर भागात राहाण्यास होती. त्यावेळी त्याच इमारतीत राहाणारा आरोपी तुषार थिगळे याच्या सोबत तरुणीची तोंड ओळख होती. याचाच फायदा उचलत भामटया तुषार थिगळे याने वर्षभरापुर्वी तरुणीसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्याने तिच्यासोबत व्हॉट्सऍपच्या माध्यमातून मैत्री वाढवून तिला महिन्याभरात लग्नासाठी मागणी घातली. त्यावेळी तरुणीने आपल्या आई-वडीलांसोबत बोलणी करण्यास त्याला सांगितल्यानंतर त्याने जुईनगर येथे राहणार्या तरुणीच्या मोठया बहिणीसोबत व भावासोबत सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्याशी ओळख वाढविली होती.
त्यानंतर डिसेंबर-२०२० मध्ये तुषार थिगळे याने तरुणीच्या आई-वडीलांना भेटून तो पुण्यात निगडी येथील प्रांत अधिकारी असल्याचे सांगितले होते. तसेच त्याच्या कामातील फोटो व व्हिडीओ दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे तुषारसोबत आपल्या मुलीचे लग्न करण्यास तरुणीच्या आई-वडीलांनी तयारी दर्शविली होती. लग्नाची बोलणी करण्यासाठी तुषार नेहमी एकटाच तरुणीच्या घरी जात होता. तसेच त्याचा त्याच्या आई-वडीलांशी कोणताही संबध नसल्याचे तो सांगत होता. तुषार व सदर तरुणी या दोघांचा आंतरजातीय विवाह असल्याने ५ मार्च २०२१ रोजी तरुणीच्या कुटुंबियांच्या रितीरिवाजाप्रमाणे रितसर विवाह करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, गत २२ जानेवारी रोजी तुषारने तरुणीच्या मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खार निर्मल नगर येथील श्रीराम मंदिरात तरुणीसोबत लग्न उरकले.
त्यानंतर तुषारने त्यांच्या लग्नासाठी सुरुवातीला महाबळेश्वर येथील रिसॉर्ट बुक केल्याचे तरुणीला सांगितले. मात्र ५० पेक्षा जास्त लोकांना त्याठिकाणी प्रवेश नसल्याचे कारण सांगत त्याने महाबळेश्वर येथील रिसॉर्टची बुकींग रद्द केल्याचे सांगितले. त्यानंतर तुषार थिगळे याने १० लाख रुपयांमध्ये चार दिवसासाठी खोपोली येथील रिसॉर्ट लग्न समारंभासाठी बुक करुन रिसॉर्टचे उर्वरित ८ लाख ९० हजार रुपयांचे भाडे भरल्याचे तरुणीच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर रिसॉर्टमध्ये ३ मार्च रोजी तरुणीचा तुषार सोबत साखरपुडा व ४ मार्च रोजी हळदी समारंभ सुरळीत पार पडला. मात्र लग्नाच्या दिवशी सकाळीच रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने रिसॉर्टचे उर्वरीत भाडे न भरल्यास पुढील कार्यक्रम पार पाडू देणार नसल्याचे सांगितले. यावेळी तुषार थिगळे याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगून त्याच्या ताब्यातील गाड्यांची विक्री करुन येणार्या पैशातुन रिसॉर्टचे उर्वरीत भाडे भरण्याचा बहाणा केला. मात्र दोन्ही गाडया त्याच्या नावावर नसल्याने त्याला गाडयाची विक्री करता आली नाही.
त्यानंतर कसेबसे तरुणीच्या नातेवाईकांनी लग्नसोहळा उरकल्यानंतर रिसेप्शन सुरु होण्यापुर्वीच रिसॉर्टच्या मालकाने पुन्हा उर्वरीत भाडे भरण्याचा तगादा लावला. त्यामुळे तरुणीच्या आई-वडीलांनी दागिने गहाण ठेवून रिसॉर्टचे पैसे भरण्याची तयारी दर्शवून तुषार थिगळेसह ते खारघर येथील ज्वेलर्स दुकानात कारने जाण्यास निघाले. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी त्यांची कार खालापुर येथे थांबली असताना, तुषार थिगळे याने त्याला पोलिसांचे फोन येत असल्याचे सांगून त्या ठिकाणावरुन पलायन केले. त्यानंतर त्याने आपला फोन देखील बंद केला. त्यानंतर तरुणीच्या आई-वडीलांनी त्यांचे दागिने गहाण ठेवुन रिसॉर्ट मालकाला ४ लाख रुपये देऊन आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर तरुणीने भामटया तुषार थिगळे याच्याबाबत अधिक माहिती काढली असता, त्याचे हर्षदासोबत विवाह झाल्याचे तिला समजले. त्यानंतर तुषार थिगळे याने फसवणुक करुन पलायन केल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
स्वत:ला प्रांत अधिकारी असल्याचे सांगणारा भामटा तुषार थिगळे हा तरुणीच्या भावाला भेटण्यासाठी पनवेल येथील त्यांच्या घरी जाताना आपण सरकारी अधिकारी आहोत, हे दाखविण्यासाठी पिवळा दिवा व सायरन असलेली इनोव्हा क्रिस्टा कार घेऊन जात होता. त्यावेळी भामट्या तुषारने तरुणीच्या भावाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून त्याच्याकडून जुलै-२०२० मध्ये ४५ हजार रुपये उकळले होते. त्याचप्रमाणे भामट्या तुषारने तरुणीचे मेव्हणे व नाशिक येथील मामे भाऊ व त्यांचे मित्र यांच्यासोबत देखील संपर्क वाढवून त्यांना कलेक्टर ऑफीस नाशिक येथे बँकेतून लिलावात निघणार्या गाडया कमी किंमतीत मिळवून देण्याचे अमिष दाखविले. तसेच त्यांच्याकडून सुद्धा दिड लाख रुपयांची रक्कम उकळली आहे.