बांधकाम व्यावसायिकाने महिलेस बारा लाखाला गंडविले

पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः इमारत अधिकृत आहे असे सांगून फ्लॅटची विक्री आणि रजिस्टर करून देऊन सदरची इमारत सिडकोने तोडल्यानंतर बारा लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे उघडकीस आला आहे. आरोपीं विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांताक्रुज मुंबई येथील सुजाता सुनिल सावंत ह्या 2014 पासून खारघर येथे फ्लॅटच्या शोधात होत्या. यावेळी त्यांना धनजी भाई सराया, भगवान गुजर आणि महेंद्र शहा हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे घर प्रकल्प सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी खारघर सेक्टर 33, ओवे गाव येथे रूम बुक केला. या इमारतीला कायदेशीर परवानगी असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकाने दिली. या फ्लॅटची एकूण किंमत बावीस लाख रुपये सांगितली. त्यांनी बारा लाख रुपये जमा केले. 2015 मध्ये त्यांच्या रुमचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. रूमचा ताबा मिळाल्यानंतर एक ते दीड वर्षात 2017 मध्ये सदरची इमारत सिडकोने अनधिकृत ठरवून तोडून टाकली. त्यापूर्वी सिडकोने बांधकाम व्यावसायिकाला नोटीस दिलेली होती. मात्र बांधकाम व्यावसायिकाने सुजता सावंत यांना याबाबत काहीही सांगितले नव्हते. याबाबत विचारणा केली असता तुम्हाला अन्य ठिकाणी रूम देऊ असे बांधकाम व्यवसायिकाने सांगितले. त्यानंतर फोन केल्यानंतर बांधकाम व्यवसायिक टाळाटाळ करू लागले. फोन उचलणे बंद केले. महेंद्र शहा, धनजी सराया आणि लक्ष्मण गुर्जर यांनी इमारत अधिकृत आहे असे सांगून फ्लॅटची विक्री केली आणि रजिस्ट्रेशन करून दिले. ही इमारत तोडल्यानंतर सुजाता सावंत यांची 12 लाख रुपयांची रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments