१ मे पासून धान्य उचल व वितरण पूर्णपणे बंद ; महाराष्ट्र राज्यव्यापी संपाला पूर्ण पाठींबा
पनवेल, दि.२० (वार्ताहर) ः ई-पॉज मशिनवरील अंगठे बंद करून धान्य वाटपास मंजूरी द्यावी अशी मागणी रास्त धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशन पनवेलचे अध्यक्ष भरत पाटील यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील दुकानदार व संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा विनिमय करून आपल्या व आपले वरिष्ठ अधिकारी यांच्या बरोबर दि .15 / 03 / 2021 व दि .07 04/2021 रोजीच्या निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे. परंतु त्याबाबत कोणत्याही अधिकार्यांनी ठोस असा निर्णय घेतलेला नाही अथवा प्रकरणांबाबत वरिष्ठांकडे व राज्यपातळीवर पाठपुराठा केलेला नाही म्हणून महाराष्ट्र राज्य संघटनेने दि. 1 मे 2021 पासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला आमच्या रास्त भाव धान्य व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर अशोसिएशन पनवेलचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रात राज्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अभूतपूर्व भीषण गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या शासनाने अधिकृत बायोमेट्रीक लाभार्थी कार्डधारकांच्या मासिक कोटयात कमालीची कपात करून थंब (अंगठा) पध्दतीचा वापर सक्तीचा केल्यामुळे कोरोना संसर्ग होण्यांची दाट शक्यता आहे. शासनाने फक्त बायोमेट्रीक पध्दतीने अंगठे प्रमाणित असतील तरच धान्य वितरण करावे, असे स्पष्ट संकेत अंमलात आणण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून लेखी परिपत्रक उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
आमच्या संघटनेची तीव्र इच्छा आहे की सध्याची परिस्थिती लक्षात घेता युध्दपातळीवर सामान्य गोरगरीबांची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे अशा राष्ट्रीय आपात्कालीन परिस्थितीत दुकानदारांनी संपावर जाणे सामान्य जनतेला परवडणारे नाही. परंतु सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाच्या रूग्ण संख्येत विक्रमी वाढ होत असून मृत्यू वाढीमुळे दुकानदार व जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच मोठया प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्यामुळे ई पॉज मशीनवर कार्डधारकांचा अंगठा घेणे बंद करणे आवश्यक आहे. आम्ही शासनाच्या प्रशासकीय चुकीच्या धोरणांचा व त्रुटीचा जाहीर निषेध करीत आहेत. रास्त भाव धान्य दुकानदारांचे कार्य सुध्दा आपत्ती निवारक कार्य असल्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता आमच्या संघटनेशी संलग्न व योगदान देणार्या महाराष्ट्रातील दुकानदारांना विमा कवच द्यावे अशी प्रमुख मागणी आहे.
महाराष्ट्रातील राज्यातील प्रत्येक जिल्हयातील व तालुक्यातील अनेक रेशनिंग संघटनांनी शासनाला विनंती अर्ज केलेले आहेत. तसेच आमच्या संघटनेने केलेल्या वरील विषयांकित पत्राची सरकार दरबारी गंभीर दखल घेवून सामान्य जनतेचा व दुकानदारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून विमा संरक्षण तसेच शासनाने अधार सिडींग करून बायोमेट्रीक केलेल्या कार्डधारकांचे धान्य कोरोना महामारी काळात पूर्ववत करणे आवश्यक आहे. बायोमेट्रीक पध्दतीने अंगठे घेवून धान्य वितरण करण्याची सक्ती आणि त्यानुसार धान्य नियतन मंजूर करणार असतील तर मंजूर नियतना प्रमाणे वितरण करण्यासाठी लाभार्थी यादीसह लेखी परिपत्रक अनिवार्य आहे.
सध्याच्या महाभयंकर परिस्थितीत कोरोना अटोक्यात येईपर्यत दुकानदारांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ई पॉज मशीनवर दुकानदारांचा अंगठा अधिप्रमाणित करून धान्य वितरणास परवानगी मिळणे आवश्यक व गरजेचे आहे.
तरी आपणांस विनंती करण्यात येते की दि.15/03/2021 व दि 04/04/2021 रोजीच्या पत्रातील मागण्या संदर्भात आमच्या दुकानदारांच्या समस्याबाबत पाठपुरवठा शासन दरबारी करून योग्य तो जलद निर्णय घेण्यांचा प्रयत्न करावा तसेच सदरच्या पत्रावर आपली काय भूमिका आहे ती आम्हाला विना बिलंव कळविण्यांची विनंती आहे अन्यथा 1 मे 2021 पासून होणा या राज्यव्यापी संपात नाईलास्तव सहभागी होणे भाग पडेल तसेच रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विरूध्द शासकीय अथवा प्रशासकीय यंत्रणेने दबावतंत्राचा वापर करून वेठीस धरण्यांचा प्रयत्न केल्यास सामुहिक राजीनामे देण्यात येतील असे भरत पाटील यांनी म्हटले आहे.
फोटो ः भरत पाटील निवेदन देताना