लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावले तरी नाट्यगृह बंद करू नयेत ; नाट्यप्रेमींची मागणी

पनवेल, दि.२ (वार्ताहर) ः  लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावले तरी पनवेल महानगरपालिकेने नाट्यगृह बंद करू नयेत अशी मागणी महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्याकडे नाट्यप्रेमींनी केली आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना रूग्णांमुळे सरकारनेही आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.. कोरोना आटोक्यात न आल्यास पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता जास्त असल्याने आमची मराठी नाट्यसृष्टी आता चांगलीच धास्तावली आहे. लॉकडाऊनमुळे गेली वर्षभर बंद असणारी नाट्यगृहं 90 दिवसांआधी सुरू झाली आहेत. नुकतीच कुठे सुरळीत सुरू झालेली मराठी नाट्यसृष्टी लॉकडाऊनमुळे पुन्हा कोलमडून पडेल आणि रंगकर्मींची निर्मात्यांची अवस्था वाईट होईल. गेल्या वर्षी मार्च अखेरीस नाट्यगृहांना लागलेले टाळे जवळपास नऊ महिन्यांनी उघडले. या नऊ महिन्यांच्या काळात रंगमंच कामगार, कलाकार, निर्माते यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली. त्यातून सावरत आता कुठे नाट्यक्षेत्र कार्यरत झाले. परंतु राज्यात करोना पुन्हा पाय पसरू लागल्याने सरकारने नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर नाट्य क्षेत्राचे गेल्यावर्षी झाले त्याहून दुप्पट नुकसान होईल, 2020 च्या नोव्हेंबर महिन्यापासून नाटक  सुरू करण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले. आज सर्व उपायांचे पालन करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असे संकट कोसळू नये,’ अशी आमची तुम्हाला विनंती आहे सर्व उपाययोजनांची कठोरतेने अंमलबजावणी करा परंतु नाट्यगृह बंद करू नका असे’ असे आवाहन राज्य सरकारला केले आहे. नाटकाचे प्रयोग सुरू होऊन आता कुठे 90 दिवस झाले आहेत. मराठी नाट्यनिर्मात्यांनी 1 वर्ष नाटक बंद असल्याने प्रचंड आर्थिक नुकसान सहन केलेलं आहे. काहीतर कर्जबाजारीही झाले आहेत. नाट्यगृह बंद झाल्यास आम्ही मोडून पडू अशी भीतीही आता आम्हाला वाटत आहे  प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन झाले नसल्याने ही अवस्था ओढवली आहे. परंतु त्याचा थेट उपजीविकेवर परिणाम होतो आहे हे लक्षात घ्यायला हवे. नाटक आजही पूर्णत: सावरलेले नाही. अशात पुन्हा त्यावर घाव बसला तर होणार्‍या भीषण परिणामांना तोंड देणे कठीण असेल. कलाकार, कामगारांनी सगळी जमापुंजी पणाला लावून मागील टाळेबंदीचा सामना केला. त्यामुळे आता सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये अशी कळकळीची विनंती नाट्यप्रेमींच्या वतीने निर्माते मंदार प्रमोद काणे यांनी केली आहे.
Comments