शासकीय अधिकारी असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास खांदेश्वर पोलिसांकडून अटक...

पनवेल दि.१६ (संजय कदम)- पुणे निगडी येथे प्रांत अधिकारी असल्याचे खोटे सांगून व बनावट ओळखपत्र दाखवून तसेच स्वतःचे पहिले लग्न झाले आहे हि बाब लपवून एका 23 वर्षीय महिलेशी विवाह करून तिच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीला लावतो व सरकारी प्लॉटमधील सेकंड हॅंड गाड्या कमी किंमतीत घेऊन देतो असे सांगून त्यांच्याकडून जवळपास 1 लाख 95 हजार रूपये घेणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासखांदेश्वर पोलिसांनी गजाआड केल्यामुळे फसवणूकीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.            खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 23 वर्षीय तक्रारदार महिलेची आरोपी नामे तुषार मारूती थिगळे (वय-28) याने अशा प्रकारे फसवणूक केली होती. तसेच हा प्रांत अधिकारी बनून फिरत असताना त्याच्याकडील गाड्यांना अंबर दिवा लावून व सोबत बाऊंसर घेऊन फिरत असे. त्याने यापूर्वी मुंबई, पुणे, नाशिक, खालापूर, ठाणे व पनवेल येथे अशा प्रकारे मुलींना लग्नाचे अमिष दाखवून, नोकरीस लावतो किंवा गाड्या खरेदी करून देतो असे सांगून बऱ्याच लोकांच्या फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारी विविध पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग, पोलिस सहआयुक्त जय जाधव, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील व सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास सोनावणे यांनी तपास सुरू केला असता पोलिस उपनिरीक्षक किरण वाघ, पोलिस हवालदार सारंग, पोलिस नाईक साळवी, पोलिस शिपाई प्रविण पाटील आदींच्या पथकाने सदर आरोपी हा वारंवार फोन नंबर व लोकेशन बदलत असतानाही तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराकडून बातमी काढून त्याला नेरूळ येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत सहा गुन्हे उघडकीस आले असून आत्तापर्यंत त्याने 1,65,86,30 रूपयांची वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. याबाबत पुढील तपास खांदेश्वरठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कोट-अशा प्रकारच्या गुन्ह्यात कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी खांदेश्वर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा.- वपोनि देवीदास सोनावणे
Comments