वाढत्या कोरोनामुळे चोर्‍यांच्या प्रमाणात घट ; मात्र कौटुंबिक वादात वाढ...

पनवेल,दि. २९ (संजय कदम) ः पनवेल परिसरात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनेक जण आपापले काम धंदे बंद करून घरीच आहेत. परिणामी घरफोडी, चोरी, लुटमार, वाहन चोरी आदी प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसत चालला असला तरी याची दुसरी बाजू म्हणजे कौटुंबिक वाद वाढत चालले असून अशा प्रकारचे दावे आता पोलीस ठाण्यामध्ये वाढीस लागले आहेत.

मागील वर्षी अशाच प्रकारे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक जण आपले उद्योग धंदे बंद करून घरीच बसले होते. त्याचा परिणाम म्हणजे गुन्हेगारी विश्‍व थंडावले होते. किरकोळ चोर्‍या-मार्‍या वगळता मोठ्या गुन्ह्यांना चांगलाच आळा बसला होता. यामुळे पोलिसांना प्रलंबित गुन्हे काढण्यासाठी वेळ मिळाला होता. तसेच गस्त घालण्यावर त्यांनी भर दिला होता. यंदाही लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. अनेक उद्योग धंदे बंद ठेवण्यात आले असल्याने अनेक जण घरीच आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कामगार वगळता रस्त्यावर वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम गुन्हेगारी विभागात सुद्धा पडला असून अनेक चोर आता चोरी, घरफोडी, लुटमार, वाहन चोरी आदी प्रकार करण्यास धजत नाही आहेत. त्याच जागोजागी पोलिसांनी लावलेले बॅरिगेटस्, नाका बंदी, वाहन तपासणी, जागता पाहरा, झाडाझडती, चौकशी यामुळे चोरांच्या मनात पोलिसांचा चांगलाच दरारा बसला आहे. याचा परिणाम म्हणजे सर्वच पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे कमी प्रमाणात दाखल झाले असून गेल्या 2 महिन्यापासून पोलिसांच्या गुन्हेगारीच आलेख कमी झाला आहे. परंतु या उलट सर्वच कुटुंब घरात राहत असल्यामुळे घराघरामध्ये वाद, शेजार्‍यांंमध्ये वाद, कौटुंबिक वाद आदी प्रकार वाढीस लागले असून त्या संदर्भातील तक्रारी आता पोलीस ठाण्यात येवू लागल्या आहेत. त्यामुळे या नवीन समस्येला पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा संबंधित व्यक्तींना समोर बसवून पोलीस समजूत काढून वाद मिटवित आहेत, असे असले तरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
Comments