लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महापौर सहाय्यता निधीस २५ लाखाची मदत
पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गोर गरीब गरजूंना सढळ मदत सातत्याने होत असते. त्याचबरोबर प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत त्यांनी लोकांना मदतीचा हात देत आधार दिला आहे. त्याच अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापौर सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपयांची मदत केली आहे. 
       सदरचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे आज (सोमवार, दि. १० मे) सुपूर्द केला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृहनेते परेश ठाकूर उपस्थित होते. 
      महापूर असो वा कोरोना महामारी किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वसामान्यांचा विचार करून नेहमीच सर्वोतपरी मदत केली आणि ती मदतीची परंपरा आजही कायम आहे.  
        आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना कोविड-१९, हृदयरोग, मेंदू संबंधित उपचार तसेच शस्त्रक्रिया, कॅन्सर संबंधित शस्त्रक्रिया, ल्युकेमिया, थॅलेसीमिया, क्षयरोग, अवयव प्रत्यारोपण, डायलिसिस, बोनमॅरो यांसारख्या गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना, अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी दुखापत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. महापौर सहाय्यता निधीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २५ लाख रुपयांची मदत करून दुर्बल घटकातील गरजूंना दिलासा देत सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. 

कोट- 
आपत्कालीन परिस्थितीत गोरगरिबांना अडचण येऊ नये यासाठी महापौर सहाय्यता निधी उपयोगी ठरणार आहे. त्या अनुषंगाने आपतग्रस्तांना मदत होण्याकरिता आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी निधी दिला आहे. - लोकनेते रामशेठ ठाकूर 

कोट- 
गेल्या वर्षी महापौर सहाय्यता निधी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सर्वप्रथम सभागृहनेते परेश ठाकूर व भाजप आरपीआयच्या नगरसेवकांनी यामध्ये मदतीचा निधी दिला. लोकसहभागातून जमा झालेला निधी नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय मदतीसाठी उपयुक्त आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २५ लाख रुपये महापौर सहाय्यता निधीला देऊन या ट्रस्टला मदत केली, त्याबद्दल मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे आभार मानते. 
                        - डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल महानगरपालिका 

Comments