परमशांतीधाम वृद्धाश्रमातील कोरोनाधित झाले कोरोनामुक्त...
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः तळोजा येथील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील कोरोनाबाधित पनवेल महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांनी कोरोनामुक्त झाले आहेत. गेले 14 दिवस पनवेल महापालिका बाधित रूग्णांना वैद्यकिय सेवा देत होती. अखेर येथील बाधित रूग्ण संपुर्ण बरे झाले असून येथील स्वामीजींनी महापालिकेचे आभार मानले आहेत.
तळोजा येथील एमआयडीसीमधील परमशांतीधाम वृद्धांश्रमातील वृध्द 17 एप्रिल रोजी बाधित झाले असल्याची माहिती कळताच महापालिकेने आपले वैद्यकिय पथक त्याठिकाणी पाठवले होते. यानंतर सगळ्यांची चाचणी केल्यानंतर 68 वृद्धांपैकी 66 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यातील 16 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. पालिकेने त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णांलयात बेड उपलब्ध करून दिले होते. या वृद्धाश्रमातील बहुतांश वृद्धांना आपले जवळचे असे कोणतेच नातेवाईक नसल्याने पालिकेने या वृद्धांची पुढील सर्व जबाबदारी घेतली. पालिकेची खारघर आणि कळंबोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकिय टिम 14 दिवस सकाळ संध्याकाळ दोन वेळेला या वृद्धांश्रमामध्ये जाऊन त्यांची तपासणी करून उपचार करत होती. तसेच त्यांना लागणार्‍या सर्व औषधांचा पुरवठाही पालिकेच्या वैद्यकिय विभागाच्यावतीने करण्यात येत होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये या वृद्धाश्रमाने सर्व खबरदारी घेत कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली होती. मात्र या दुसर्‍या लाटेमध्ये या वृद्धाश्रमांमध्ये वेगाने कोरोनाचा शिरकाव झाला. पालिकेने केलेल्या उपचाराचा इथल्या वृद्धाश्रमातील बाधितांना मोठा दिलासा मिळाला. अवघ्या काही दिवसात पालिकेच्या अथक प्रयत्नाने इथल्या बाधितांनी कोरोनांवर मात केली आणि सगळे रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहे. पालिकेने दिलेल्या सहकार्याबद्दल येथील व्यवस्थापन पाहणार्‍या स्वामीजींनी पालिकेचे मनापासून आभार मानले. यावेळी स्वामीजींचे डोळे पाणावले होते.


फोटो ः परमशांतीधाम वृद्धाश्रम
Comments