कोळखे येथे सरपंच मिनल रोहन म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने लसीकरण केंद्र सुरु.....
आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते उदघाटन 
पनवेल / प्रतिनिधी :  पनवेल  तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आजिवली  मार्फत रायगड जिल्हा परिषद शाळा कोळखे मधे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल रोहन म्हात्रे यांच्या पाठपुराव्यापुळे हे शक्य झाले असून या नजिकच्या लसीकरण केंद्रामुळे विभागातील नागरिकांना मात्र चांगलाच दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी नगरसेवक व शेकापचे पनवेल महानगर चिटणीस गणेश कडू, पंचायत समितीचे उपसभापती भरत म्हात्रे , सरपंच मिनल म्हात्रे , सदस्य रोहन म्हात्रे , सदस्य दिगंबर पाटील, सदस्य गणेश जाधव , सदस्या अपेक्षा जाधव , काँग्रेसचे पळस्पे पंचायत समिती गण अध्यक्ष भालचंद्र पाटील , माजी उपसरपंच दिनकर मुंढे, सुरेश मुंढे , पुरुषोत्तम पाटील, डॉ. संदेश गोवारी  आदींसह ग्रामस्थ  उपस्थित होते.

 एकीकडे जगभरात कोरोना या भयंकर आजाराने थैमान घातले असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने कोरोना पासून नागरिकांचा बऱ्याच अंशी  बचाव होत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज दूर होऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे त्यामुळेच आता सर्वत्र लसीकरणाला वेग आलेल्या असताना आजिवली  प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये सुद्धा लसीकरणाला आता चांगलाच वेग येऊ लागला आहे. जसजशा प्रमाणात लस उपलब्ध होईल तसा लसीकरणाचा अजून वेग वाढेल त्यामुळेच कोरोना महामारीला निश्चितच आळा बसेल व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल, असे आशादायी चित्र निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे.  

यावेळी बोलताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, लसीकरण वेगाने होणे गरजेचे असतानाच कोळखे पंचायतीने लसीकरण केंद्र सुरु करून ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी करण्यासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अफवेला बळी न पडता ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घ्यावे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे सातत्याने पाठपुरावा करून हे लसीकरण केंद्र सुरु केले आहे. कोव्हीड चे सर्व नियम पाळून याठिकाणी लसीकरण व्हावे. कोव्हीड काळात ग्रामस्थांना कोणतीही अडचण येत असल्यास रोहन म्हात्रे व सहकारी सदैव तत्पर राहतील त्यामुळे नागरिकांनी फक्त नियमांचे पालन करावे आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आमदार पाटील यांनी शेवटी केले. 
 कोळखे ग्रामस्थांच्या सोयीसाठी कोळखे ग्रामपंचायतीचे सरपंच मीनल म्हात्रे व सदस्य हे या कोविड कालावधीत ग्रामस्थांना कोरोना लस घेणे सोयीचे व्हावे याकरिता कोळखे येथे लसीकरण केंद्र मिळावे यासाठी प्रयत्नशील होते. सदर केंद्रावर सध्याच्या शासनाच्या नियमानुसार ४५ वर्षावरील नागरींकांचे लसीकरण सुरू झाले आहे. पुढील लसीकरणाचे वेळापत्रक लसीच्या उपलब्धतेनुसार जाहीर करण्यात येईल, असे सरपंच मिनल रोहन म्हात्रे यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घेताना नागरिकांच्या खिशाला कात्री लागते. त्यामुळे कोळखे येथे याआधीच उपकेंद्र सुरु करणे आवश्यक होते . पनवेल  तालुक्यात वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे होते. जिल्ह्यात तसेच पनवेल  तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सगळीकडे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान  कोळखे पंचायतीच्या सरपंच मीनल रोहन म्हात्रे  यांच्या प्रयत्नामुळे कोळखे येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असुन  पहिल्याच दिवशी ५० जणांना कोरोना लस देण्यात आली असुन सकाळी ९ ते ५ या वेळेत लस उपलब्ध असणार आहे.तसेच कोरोनाची लस घेतलेल्यांनी नियमीत तोंडाला मास्क, नियमित सॅनिटायझरने हात धुणे ,सोशल डिस्टसिंगचे पालन करणे,तसचे लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर संदेश गोवारी यांनी केले आहे.
Comments