पनवेल : आरटीआय चारीटेबल ट्रस्टचे आयसीआयसीआय व इतर बँकांचे बनावट स्टेटमेंट आणि बँकेची बनावट एफडी बनवून त्या खऱ्या आहेत असे भासवून हजारो कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे असे आमिष दाखवून पंधरा जणांची एक कोटी 97 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्त शासकीय अधिकारी असलेले जगन्नाथ खंडेराव जाधव हे औरंगाबाद येथे राहतात. यावेळी त्यांना स्वामी देवजी हंस यांचे खारघर येथे आरटीआय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असून या ट्रस्टकडे हजारो कोटी रुपये आहेत व ते त्यांना चांगल्या कार्यासाठी दान करावयाचे आहेत अशी माहिती मिळाली. व आरटीआय ट्रस्टमध्ये सदस्य होण्यासाठी पाच लाख रुपये भरावे लागतात असे त्यांना एकाने सांगितले. यावेळी ते सेक्टर 7, खारघर येथील ट्रस्ट मध्ये आले असता विपुल वाखाणी यांनी त्यांच्या फाईल मधील आरटीआय ट्रस्टच्या आयसीआयसीआय बँकेत सात हजार 889 कोटी रुपये शिल्लक असल्याचे बँकेचे स्टेटमेंट दाखवले. यावेळी श्री स्वामी देवजी हंस यांनी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात त्यांचे प्रतिनिधी असून ते जिल्ह्यातील उद्योगपती, शैक्षणिक संस्था चालक, शेतकरी, प्राध्यापक यांना भेटून स्वामीजींच्या ट्रस्टकडे हजारो कोटी रुपये आहेत व त्यांना चांगल्या कार्यासाठी दान करावयाचे असल्याचे सांगत असतात असे सांगितले. त्यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून पाच लाख रुपये किमतीचे 2 चेक आरटीआय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने 2019 मध्ये जगन्नाथ जाधव यांनी दिले. यावेळी त्यांच्या लेटरहेडवर स्वामी देवजी हंस यांनी स्वाक्षरी करून वेलकम लेटर व ठराव पत्र दिले. त्यानंतर जाधव यांनी सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आरटीआय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे स्वामी देवजी हंस व विपुल वाखाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चेक घेण्यासाठी खारघर येथे येण्यास सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येकी पाच कोटी रकमेचे 2 चेक जाधव यांना दिले. व ते चेक सांगितल्याशिवाय टाकू नका असे सांगितले.
तीन महिन्यांनी चेकची तारीख व पेऑर्डरची तारीख उलटून गेल्याने स्वामी हंस व वाखाणी यांच्याशी जाधव यांनी संपर्क साधला असता ट्रस्टच्या 400 कोटी रुपयांची इन्वेस्ट एफडी करत आहोत व व त्या एफडीच्या आधारे ते 30 कोटी रुपये देऊ असे सांगण्यात आले. व पुन्हा एफडीची रक्कम स्वीकारण्यासाठी खारघर येथील ऑफिस मध्ये येण्यासाठी सांगितले. जाधव ऑफिसमध्ये आले असता बँकेचे अधिकारी राहुल भगत व संदीप भगत यांनी फिनो पेमेंट बँकेत दहा एक कोटीची एफडी करण्यात येईल व एफडीएच्या आधारे 20 टक्के रक्कम 45 दिवसात कर्ज म्हणून सर्वांच्या फिनो पेमेंट बँकेतील खात्यात जमा होईल असे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी पती-पत्नीचे खाते बँकेत उघडून घेतले. यावेळी जाधव यांच्याकडून शंभर रुपयाच्या पाच कोऱ्या स्टॅम्प पेपर वर सह्या घेऊन ते लोनच्या कामासाठी बॉंड लिहून घेण्यासाठी घेतले असून ते स्वामी व वाखाणी यांनी ठेवले असल्याचे सांगण्यात आले.
ऑगस्ट 2019 मध्ये पाच कोटी रकमेची दोन्ही चेकची तारीख उलटून गेली. त्यामुळे त्या बदल्यात पंधरा दिवसात जाधव यांच्या नावे 20 कोटी व पत्नीच्या नावे 10 कोटी रकमेची एफडी उघडतो असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा स्वामी देवजी हंस व विपुल वाखाणी यांच्याशी संपर्क साधला असता जुलै 2020 मध्ये कर्जाची रक्कम फिनो बँकेच्या खात्यावर जमा होईल असे सांगण्यात आले. मात्र रक्कम काही जमा झाली नाही. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये जमा होतील असे सांगण्यात आले. ऑगस्ट मध्ये देखील कर्जाची रक्कम खात्यावर जमा न झाल्याने स्वामी हंस व विपुल वाखाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन घेण्यास टाळाटाळ केली. यावेळी जाधव यांनी इतर लोकांकडे चौकशी केली असता अनेक लोकांची फसवणूक झाल्याचे त्यांना समजले.त्यामुळे आरटीआय चॅरिटेबल ट्रस्टचे देवीप्रसाद तिवारी उर्फ स्वामी देवजी हंस, विपुल वाखाणी, फिनो बँकेचे अधिकारी राहुल भगत, संदीप भगत यांनी बनावट एफ डी बनवून त्या खऱ्या असल्याचे भासवून करोडो रुपयांचे अनुदान मिळणार आहे असे आमिष दाखवले आणि 15 जणांकडून 1 कोटी 97 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. त्यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.