पनवेल दि. २७ (वार्ताहर): भगतवाडी- सुकापूर ते नेरे परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव यांनी केली आहे.
पनवेल तालुक्यातील सुकापूर, आकुर्ली, नेरे, मोरबे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. भरमसाट वाढलेल्या लोकवस्तीमुळे वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. येथील रस्त्यावर वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांना मनस्तप सहन करावा लागतो. त्यातच सुकापूर पासून रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण वाढत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर रिक्षा पार्किंग, हातगाड्या, अनधिकृत व्यवसाय केले जात असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताला आमंत्रण मिळते. येथील रस्त्यांवर रोज छोटे मोठे अपघात घडत असतात. रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेकदा प्रवासी किंवा वाहन चालकांना खाली उतरावे लागते. त्यामुळे वेळ आणि इंधन वाया जाते. या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमल्यास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नसल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी व्यक्त केले आहे.