पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः फ्लॅटचा ताबा देतो असे सांगून एक कोटी 4 लाख 62 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी गॅलेक्सी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे महेश सोमीस्कर उर्फ मोहम्मद सलीम वारसी (38) याला अटक केली आहे.
सीबीडी बेलापूर सेक्टर 2 येथील नितेश जवळकर व इतर नागरिकांनी नवीन पनवेल सेक्टर 17 येथील गॅलेक्सी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे प्रो.प्रा.मोहम्मद सलीम वारसी यांच्याकडे फ्लॅटसाठी बुकींग केली होती. त्यांना फ्लॅटचा ताबा देतो असे सांगून त्यांच्याकडून 1 कोटी 4 लाख 62 हजार रुपये घेण्यात आले. मात्र फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे बुकींग पोटी दिलेली रक्कम परत मागितली. मात्र महेश सोमीस्कर उर्फ मोहम्मद सलीम वारसी याने रक्कम व फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वपोनि देवीदास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पोळ व पथकाने त्याला साकीनाका मुंबई येथून अटक केली आहे.