पनवेल दि. २८ (वार्ताहर)- 20 मे 2021 रोजी श्री साई नारायण बाबा ब्रह्मलीन झाले.भगवती साई संस्थानच्या पनवेल येथील भव्य साई मंदिरात त्यांची विधीवत समाधी बांधण्यात आली होती. त्यांची सजीव मूर्ती स्थापित करण्याचा सोहळा साई भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नंतर श्री साई नारायण बाबा यांच्या गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची व्हिडिओ सिडी लावून, साई भक्तांना विधिवत दीक्षा देण्यात आली. तसेच श्री साई नारायण बाबा यांचा उपदेश आणि आशीर्वाद ही साईभक्तांना प्राप्त झाला.
यानंतर श्री साई नारायण बाबा यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरू झाला, या मध्ये होमहवन नवग्रह शांती इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता.या आधी नऊ दिवस रोज एका प्रकारच्या धान्यांमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते.बरोबर साडे बारा वाजता ब्राह्मणांनी मंत्र उच्चारण करीत श्री साई नारायण बाबांच्या मूर्तीच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून सर्वांना मूर्तीचे दर्शन दिले. ही मूर्ती नव्हे तर प्रत्यक्ष साई नारायण बाबाच प्रत्यक्ष समोर बसले आहेत असे सर्वांना वाटत होते, इतकी ही मूर्ती सजीव आहे.
श्री साई नारायण बाबा यांनी चार वर्षापासून आपली देह त्यागाची योजना आखली होती. त्याप्रमाणे त्यांनी आपली मार्बलची मूर्ती बनवून घेतली होती.लॉकडाऊनच्या काळात फेसबुक वर रोज संध्याकाळी सात वाजता साईवाणी हा ऑनलाईन सत्संग सुरू करून त्यांनी साईभक्तांना साईबाबां पासून विभक्त होऊ दिले नाही. त्यांनी 401 दिवस ऑनलाईन साई वाणी सत्संग पूर्ण केले, त्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यांना कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांनी आपल्या पूर्व योजनेनुसार 20 मे 2021 रोजी देहत्याग केला.त्यांच्या जाण्याने लाखो साई भक्तांना दुःख झाले होते परंतु आता मूर्ती रूपाने साई भक्तांच्या कल्याणासाठी श्री साई नारायण बाबा पुन्हा अवतीर्ण झाल्याने साई भक्तांना खूप आनंद झाला आहे. ही मूर्तीसुद्धा इतकी सजीव आहे की प्रत्यक्ष श्री साई नारायण बाबाच समोर बसले आहेत असे वाटते.