शहरातील दुकाने सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी द्या ; शिवसेना खा.श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी....


पनवेल वैभव वृत्तसेवा / 13 जुलै  :-  दुपारी चारनंतरही नागरिकांची रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याचा सरकारचा हेतू सफल होत नाही. लॉकडाऊनमुळे व्यापा-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे 12 तास शहरातील दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी. तसेच हॉटेल व्यावसायिकांनाही हॉटेल चालू ठेवण्याची सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की,  पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी आहे. चार वाजेपर्यंतच दुकानांना परवानगी असली  तरी रस्त्यावरील गर्दी ओसरलेली नाही. नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. लोक घराबाहेर पडतात. कोरोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. परंतु, नागरिकांच्या गर्दीमुळे दुपारी चार वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवण्याचा सरकारचा उद्देश सफल होत नाही.

सर्वसामान्य जनतेला लॉकडाउन मान्य नाही. चार वाजेपर्यंतच दुकाने घडण्यास परवानगी असल्याने व्यापारी वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. व्यापा-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारविषयीही नाराजी निर्माण होत आहे. या सर्वांचा विचार करुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे 12 तास शहरातील दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी. हॉटेल व्यावसायिकांनाही सवलत देण्यात यावी. दुकानाचे शटर बंद ठेवून आतून व्यवहार चालू ठेवले जातात. याचा गैरफायदा प्रशासनाकडून  घेतला जातो. त्यासाठी सरसकट 7 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.



Comments