एलपीजी गॅसची डिस्ट्रीब्यूटर शिप न देता केली ७ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक...

पनवेल दि.15 (वार्ताहर): एलपीजी गॅसची डिस्ट्रीब्यूटर शिप न देता आकुर्ली येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेची तब्बल सात लाख एकतीस हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             साक्षी पार्क, आकुर्ली येथे राहणाऱ्या संगीता फापाळे यांनी एलपीजी गॅस डिस्ट्रीब्यूटर साठीची जाहिरात वाचली होती. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन अर्ज भरला. यावेळी सेल्स ऑफिसर सुरज आहीवले यांनी त्यांना कागदपत्रे पाठवण्यासाठी सांगितले. व ऑनलाईन अर्ज भरून २१ हजार ३०० रुपये बँकेत भरायला सांगितले. फापाळे यांनी त्यांची कागदपत्रे पाठवली व पैसे बँकेत भरले. त्यानंतर सर्टिफिकेटची फी ९७ हजार ३०० रुपये भरण्यास सांगितले. ५ जानेवारी २०२१ रोजी सुरज यांनी व्हाट्सअप मेसेज व मेलवर भारत गॅस डिस्ट्रीब्यूटरचे सर्टिफिकेट पाठवले. यावेळी फापाळे यांनी ग्रामीण भागाचे सर्टिफिकेट हवे आहे असे सांगितले. तेव्हा सुरज  आहीवले यांनी भारत गॅसचे डिपॉझिट म्हणून ५ लाख रुपये व कमीत कमी ६५० गॅसच्या टाक्या घ्यावे लागतील असे सांगितले. व प्रत्येक टाकी साडे आठशे रुपये प्रमाणे पडेल व टाकीचे डिपॉझिट म्हणून पाच लाख 55 हजार दोनशे रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फापाळे यांनी डिपॉझिटचे पाच लाख व उर्वरित ९४ हजार ही रक्कम गॅस सिलेंडर टाकीसाठी डिपॉझिट मधील रक्कम म्हणून बँक खात्यात भरली. त्यापुढे गॅस टाकी, ऑफिस गोडाऊनचे बांधकाम यासाठी जे पैसे भरायचे होते त्यासाठी बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी सुरज यांना सांगितले. मात्र त्यांनी कंपनीच्या मीटिंगमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. संगीता फापाळे यांनीसुरज यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे संगीता फापाळे यांनी भारत गॅसचे हेड ऑफिस, मुंबई येथे चौकशी केली असता सुरज नावाचा कोणीही कर्मचारी त्यांच्याकडे काम करत नसल्याचे समजले. यावेळी त्यांनी भारत गॅस बुक खाते दाखवले असता ते भारत गॅसचे बँक खाते नसल्याचे समजले. यावेळी फसवणूक झाल्याचे  फापाळे यांच्या लक्षात आले. भारत गॅसचा कर्मचारी आहे असे भासवून भारत गॅस ऑनलाईन वेबसाईट वर जाऊन अर्ज करण्यास सांगून एलपीजी डिस्ट्रीब्यूटर देतो असे सांगून फापाळे यांची सात लाख एकतीस हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments