जन आशिर्वाद यात्रा ; मंगळवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील रायगड दौऱ्यावर ...
पनवेल(प्रतिनिधी) :-. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि.  १७ ऑगस्ट) रायगड जिल्हा दौरा आहे. ते जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद, आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार करणार आहेत. 
         रायगड जिल्ह्यातील या जन आशिर्वाद यात्रेला अलिबाग येथून सकाळी ८. ३० वाजता प्रारंभ होणार असून पेण, पनवेल असे मार्गक्रमण करून उरण तालुक्यातील जासई येथे रायगड जिल्ह्यातील यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार नितेश राणे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, पेण नगराध्यक्षा प्रितम पाटील, यांच्यासह ज्येष्ठ नेते, जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेते तसेच लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे. 
          जन आशिर्वाद यात्रेला  १७ ऑगस्ट रोजी अलिबाग येथून सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्वप्रथम ते सकाळी ८. ३० वाजता अलिबाग कोविड रुग्णालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर अलिबाग विश्रामगृह येथे सकाळी ०९ वाजता पत्रकार परिषद आणि सकाळी १० वाजता लाभार्थी व मच्छिमारांची भेट, त्यानंतर हुतात्मा स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सरखेल कान्होजी आंग्रे समाधी,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तसेच संत सेवालाल मंदिर  येथे अभिवादन करणार आहेत.  त्यानंतर भाग्यलक्ष्मी हॉल येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा, चरी येथे आंदोलनातील व्यक्ती व त्यांच्या परिवाराचा सत्कार सोहळा, त्यानंतर पेझारी चेक पोस्ट आणि वाशी नाका येथे यात्रेचे स्वागत, असे मार्गक्रमण करून ते पेणकडे प्रयाण करणार आहेत.  दुपारी १२. ४५ वाजता पेण येथे आमदार रवीशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकारांची भेट, त्यानंतर पनवेलकडे रवाना होत असताना खारपाडा येथे स्वागत, त्यानंतर दुपारी ०२. १५ वाजता शिरढोण येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारकास भेट देऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर पळस्पे फाटा येथे स्वागत, दुपारी ३. ०० वाजता पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३. १० वाजता आगरी समाज सभागृहात लाभार्थी भेट कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ०४. ३० वाजता उरण तालुक्यातील जासई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करून लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालय येथे प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५. ३० वाजता नवी मुंबईतील जन आशिर्वाद यात्रेच्या कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत.
Comments