वाढीव मालमत्ता करासह पाणी टंचाई संदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्ट मंडळाने घेतली आयुक्त गणेश देशमुख यांची भेट
पनवेल, दि. ३० (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेने लादलेला वाढीव मालमत्ता करासह अनेक ठिकाणी होत असलेल्या पाणी टंचाई संदर्भात आज पनवेल महानगर पालिकेत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकचेे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन मालमत्ता कर व पनवेल मधील पाणी प्रश्‍नावर चर्चा केली.  
त्याप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील,  काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, पनवेल महानगर पालीकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, शिवसेनेचे  तालुका संघटक भरत पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत , यतीन देशमुख , पनवेल शहर प्रमुख अच्युत मनोरे,  आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नागरिकांवर लादलेल्या वाढीव मालमत्ता करासंदर्भात संताप व्यक्त करून शासनाच्या माध्यमातून या करातून नागरिकांना योग्य मार्ग काढून द्यावा, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे ऐन सणासुदीच्या दिवसात व चांगला पाऊस झाला असतानाही अनेक भागामध्ये पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत अभ्यास करून पनवेलकरांना पाणी टंचाईपासून मुक्त करावे, अशी मागणी सुद्धा या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली आहे.


Comments