सिडको कार्यालयावर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल ..

पनवेल : खारघर, तळोजा व कामोठे परिसरातील पिण्याच्या पाण्या संदर्भात भेडसावत असलेला प्रश्न त्याचप्रमाणे रस्ते, गार्डन, खेळाची मैदाने व इतर नागरी सोयी सुविधांच्या मागणीसाठी सिडकोविरोधात मोर्चा काढुन आंदोलन करणाऱ्या 75 ते 80 आंदोलनकर्त्यां विरोधात सीबीडी पोलिसांनी मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाकडून सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटनाना मोर्चा, निदर्शने, धरणे व उपोषणासारखे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कामोठा, खारघर व तळोजा परिसरातील  पाण्याची समस्या, रस्ते, गार्डन, खेळाची मैदाने व इतर नागरी सोयी सुविधांच्या मागण्यांकडे  सिडकोचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारी सिडको कार्यालयावर मोर्चा काढुन आंदोलन करण्यात आले.  
मोर्चा काढण्यास परवानगी नसताना खारघर, कामोठे व तळोजा भागातील नागरिकांनी  गर्दी जमवून राज्य शासनाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने सीबीडी पोलिसांनी खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष मंगेश रानवडे, उपाध्यक्ष इम्तियाज शेख, नगरसेविका लिना गरड, सचिन बागवे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कामोठा, खारघर व तळोजा भागातील 75 ते 80 आंदोलन कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र कोवीड-19 विनियमनासह, मनाई आदेशाचा भंग करुन विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Comments