वाढत्या कचऱ्याच्या डंपिंगमुळे पारगावकर त्रस्त ; सिडकोने त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी
पनवेल दि. ३१ (वार्ताहर): सिडकोच्या दुर्लक्षामुळे ग्रुप ग्रामपंचायत पारगाव डम्पिंग ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रत्यक्षात पारगावकर गेल्या अनेक वर्षापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे कचरा गोळा करून डम्पिंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला  धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने व सिडकोने तातडीने डम्पिंग ग्राउंड साठी जागा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी सिडकोसह रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे केली आहे.         
डंपिंग प्रश्नासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून सिडकोने तातडीने डम्पिंगची जागा निश्चित करून देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डंपिंगचा प्रश्न अत्यंत महत्त्वाच्या असून पारगाव ग्रामपंचायत अंतर्गत या भागातील लोकसंख्या ३५०० आहे. दररोज सुमारे टन भर कचरा गोळा केला जातो. सिडको याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पारगाव गावाच्या जमिनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केल्या आहे. ५० टक्के जमिनी ग्रुप ग्रामपंचायत पारगाव हद्दीतील असून सिडको अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत शासनाकडे अनेक निवेदन देऊन त्याचा काही उपयोग होत नाही, त्यामुळे सदर जमिनी आपण सिडकोला देऊन फार मोठी चूक केली आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.           

फोटोः पारगाव येथील डंपिंग
Comments