पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण केंद्रावर रात्रभर नागरिकांच्या रांगा; सुविधा उपलब्ध करून देण्याची रामदास शेवाळे यांची मागणी
पनवेल दि.01 (वार्ताहर)- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण केंद्रावर रात्रभर नागरिकांना रांगा लावून उपस्थित रहावे लागत आहे. तरी या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.           पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांवर तसेच इतर ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी उपलब्ध लसी प्रमाणे नागरिकांना लस दिली जाते. वास्तविक पाहता एकूण लोकसंख्या आणि मिळणारी लस यांच्या प्रमाणामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जात असले तरी त्या ठिकाणी शुल्क आकारले जात आहे. कोरोना वैश्विक संकटामध्ये आर्थिक स्थिती बेताची झाल्याने अनेक कुटुंबांना पैसे देऊन लस घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ते शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत लस देण्यास प्राधान्य देत आहेत. अल्प उत्पादन गट आणि सर्वसामान्य कुटुंबातील अनेक जण येथे रांगा लावून लस घेतात. कळंबोली येथील गुरुद्वारा समोरील लसीकरण केंद्रावर रात्री बारा वाजल्यापासून नागरिक रांगा लावत आहेत. अशीच परिस्थिती एकंदरीत पालिका क्षेत्रातील सर्वच केंद्रावर आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी हे नागरिक  संपूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढतात. डासांचा उपद्रव त्यांना सहन करावा लागतो. धुळीचा त्रास संबंधितांना होतो त्याचबरोबर पाऊस येत असल्यास छत्री घेऊन तेथेच थांबावे लागते. सकाळी आठ वाजता त्यांना टोकन वाटप केले जाते. दरम्यान लसीकरण केंद्रामध्ये खुर्च्या त्याच बरोबर बसण्यासाठी व्यवस्था आहे. त्या ठिकाणी लाईट आणि फॅन ची सोय सुद्धा आहे. मात्र येथील कर्मचारी नागरिकांना आत मध्ये प्रवेश करून देत नाहीत. परिणामी मोठया  गैरसोयीला आणि त्रासाला त्यांना सामोरे जावे लागते. इतर वसाहतींमध्ये ही थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासंदर्भात लक्ष केंद्रित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. तसेच लसींचा साठा वाढवण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासनाने पाठपुरावा आणि प्रयत्न करावेत अशी न्याय मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आपल्याकडे करीत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करीत आहे. अन्यथा नागरिकांच्या गैरसोयी विरोधात आम्हाला महापालिका प्रशासना विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा रामदास शेवाळे यांनी दिला आहे.
         फोटोः रामदास शेवाळे
Comments