पोलीस नाईक महेश पाटील यांची धाडसी कामगिरी, तक्का गणपती विसर्जन घाटावर बुडणाऱ्यांना वाचविले..
पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकांची धाडसी कामगिरी, महेश पाटील यांना वरिष्ठांकडून कौतुकाची थाप

पनवेल, दि.26 (वार्ताहर)- 'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला आहे. पनवेल परिसरात शनिवारी ता. 25 रोजी गौरा गणपतीचे दिवसभरात शांततेत विसर्जन पार पडले. मात्र, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पनवेल परिसरातील तक्का येथील गणपती विसर्जन घाटात गणपतीचे विसर्जन करण्याकरिता पाण्यात उतरलेल्या दोन व्यक्तींना पाण्यात अंदाज न आल्याने बुडत  होते. हि घटना लक्षात येताच पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेश पाटील यांनी जीवाची बाजी लावत त्या पाण्यात बुडणाऱ्याना वाचविले. या धाडसी कामगिरीमुळे पाटील यांना वरिष्ठांनी कौतुकाची थाप दिली आहे. खाकी वर्दीतील माणसाने माणुसकीचे दर्शन घडविल्याने पोलिसांच्या संवेदनशीलतेची प्रत्यंतर आले.
         अनंत चतुर्दशीला देशभरातील गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर अशी आर्त हाक देत साश्रू नयनांनी निरोप दिला. पनवेल तालुक्यातही लाडक्या बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. असे असले तरी भाद्रपदात येणाऱ्या संकष्ठ चतुर्थीला अनेक घरात आणि सार्वजनिक ठिकाणी गौरा गणपती बसवण्याची जुनी परंपरा आहे. या गणपतीला साखर चौथ गणपती असे संबोधले जाते. या गणपती बाप्पाचे शनिवारी ता. 25 रोजी उत्साहामध्ये  विसर्जन करण्यात आले. कोविड नियमांमुळे यंदा गणेश विसर्जनासाठी अनेक नियमांचे बंधन घालण्यात आले आहे. त्याच्या चौकटीत राहून गर्दी टाळत यंदा विसर्जन पार पडला. तक्का विसर्जन घाटावर अत्यंत शिस्तबद्धपणे विसर्जन सुरू असतानाच येथील गणपती विसर्जन घाटावर विसर्जनाकरिता आलेले एक 50 वर्षीय तर दुसरा 25 वर्षीय व्यक्ती गणपती बाप्पा.. मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...असे म्हणत पाण्यात उतरले. व पुढे-पुढे जाऊ लागले. यावेळी ते दोघेही खोलवर पाण्यात गेल्याने पाण्यात बुडू लागले. वाचवा.. वाचवा आवाज ऐकताच त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, पोलीस हवालदार पवार, महिला पोलीस दुधाळ यांनी मदत करीत त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस निरीक्षक संजय जोशी, पोलीस नाईक महेश पाटील, अशोक राठोड, नितीन वाघमारे हे पोलीस वाहनातून गस्त घालीत असताना बल्लाळेश्वर विसर्जन घाटावरून तक्का विसर्जन घाटावर पोहोचले. यावेळी हि घटना पाहातच काही क्षणातच संजय जोशी यांच्यासह पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. यावेळी त्याठिकाणी अंधार असतानाही देखील पोलीस नाईक महेश पाटील यांनी जीवाची बाजी लावत या नदीतील खोलवर पाण्यात उडी मारून त्या बुडणाऱ्याना दोघा व्यक्तींना बाहेर काढले. व त्यांचे प्राण वाचविले. यामुळे महेश पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळे तक्का येथील गणेशभक्त, रहिवाश्यानी पाटील यांना धन्यवाद देत आभार मानले. त्याचबरोबर या धाडसी कामगिरीमुळे वरिष्ठांनी देखील पाटील यांच्यावर कौतकाची थाप दिली आहे.


खाकी वर्दीवरील विश्वास आणखी घट्ट.
आधीच कोविड काळात हे खाकी वर्दीवाले करोना योद्धे आपले रक्षण करत आहेत. त्यात आता परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेश पाटील यांनी पुन्हा एकदा खाकीतल्या देवाचे दर्शन दिल्याने खाकी वर्दीवरील विश्वास आणखी घट्ट झाल्याचं पाहायला मिळालं.       
Comments