चार वर्षात रक्कम दुफ्पट करुन देण्याच्या बहाण्याने फसवणुक करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु

पनवेल  दि. 1 (वार्ताहर) : फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवलेली रक्कम चार वर्षात दुप्पट करुन देण्याचे अमिष दाखवून एका भामटयाने पनवेल व आजुबाजुच्या भागातील अनेक व्यक्तींकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणुक केल्याचे उघडकिस आले आहे. निनाद खानावकर असे या भामटयाचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी निनाद खानावकर हा तळोजा भागातील नावडे परिसरात राहण्यास असून त्याने 2016 मध्ये दिशा फॉरेक्स ट्रेडिंग ऍन्ड इन्वेस्टर्स या नावाने कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर त्याने नावडे परिसरात कार्यालय थाटून त्याच्या कंपनीतील गुंतवणुकीच्या योजनांची जाहिरातबाजी केली होती.  फिक्स डिपॉझीट म्हणून गुंतविलेली रक्कम 4 वर्षात हमखास दुप्पट करुन देण्याची त्याने योजना त्याच्या कार्यालयातून सुरु केली होती. त्याने केलेली जाहिरातबाजी व दाखविलेला विश्वास याला भुलून पनवेल व आजुबाजुच्या भागातील अनेक व्यक्तींनी त्यांच्याजवळ असलेली लाखो रुपयांची रक्कम निनाद खानावकर याच्या कंपनीत फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतविली होती.  
दरम्यान, गुंतवणुकिच्या या योजनेला 2020 मध्ये चार वर्षे पुर्ण झाल्यानंतर काही गुंतवणुकदारांनी निनाद खानावकर याच्या कार्यालयात दुप्पट पैसे घेण्यासाठी धाव घेतली. मात्र त्याचे कार्यालय बंद असल्याचे आढळुन आले. त्यामुळे गुंतवणुकदारांनी निनादच्या घरी जाऊन त्याच्याकडे आपल्या रक्कमेबाबत विचारपुस केल्यानंतर त्याने करोनाचे कारण सांगून दोन महिन्यात त्यांना त्यांची रक्कम देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे  गुंतवणुकदारांनी 2 महिन्यानंतर त्याला संपर्क साधला असता, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्याने पैसे परत देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास करुन आरोपी निनाद खानावकर याच्या विरोधात फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.  

चौकट  
आरोपी निनाद खानावकर याच्या दिशा फॉरेक्स ट्रेडिंग ऍन्ड इन्वेस्टर्स या कंपनीत प्रमोद पवार यांनी 1 लाख रुपये, काळुराम पाटील- 2 लाख 50 हजार रुपये, प्रमोद पाटील 6 लाख रुपये, कवीता शेळके 10 लाख रुपये, ऋतुजा शेळके 5 लाख रुपये गुंतविले आहेत. याशिवाय निनाद खानावकर याने अनेक लोकांकडून अशाच पद्धतीने मोठी रक्कम उकळली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
Comments