उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी शेकापच्या समिधा निलेश म्हात्रे

पनवेल /  वार्ताहर
 उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी समिधा निलेश म्हात्रे यांची आज (सोमवार दि.२० सप्टेंबर) बिनविरोध निवड झाली. उरण पंचायत समितीचे विद्यमान सभापती ऍड.सागर कडू यांनी ठरल्या मुदतीप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती पदाच्या जागेकरिता सोमवारी निवडणूक घेण्यात आली. उरण पंचायत समितीमध्ये ८ सदस्य असून शेतकरी कामगार पक्षाचे ५, शिवसेनेचे २ व भाजपचे १ याप्रमाणे सदस्य संख्याबळ आहे. 
         उरण पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे पूर्ण बहुमत आहे. राज्यात निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळे आघाडीत शिवसेना, शेकाप सामील आहे. त्यामुळे उरण पंचायत समितीमध्ये या आघाडीचे ८ पैकी ६ सदस्य महाविकास आघाडीचे आहेत. शेतकरी कामगार पक्षाने व्यवसायाने कम्प्युटर इंजिनिअर असलेल्या सौ.समिधा निलेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती.साहजिकच निवडणुकीची औपचारिकता शिल्लक होती. सोमवारी झालेल्या निवडणूकीत उरणचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधेरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सौ.समिधा म्हात्रे या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. सौ.समिधा म्हात्रे या आवरे पंचायत समिती गणामधून सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या. आज झालेल्या निवडणुकीत समिधा म्हात्रे यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 'शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, लाल बावटेकी जय' या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
          यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी सभापती काशिनाथ पाटील, उरण तालुका शेकाप चिटणीस मेघनाथ तांडेल, जि.प.काँग्रेसचे पक्षप्रतोद बाजी परदेशी, अखिल भारतीय कराडी समितीचे अध्यक्ष महादेव बंडा, नगरसेविका प्रीती जॉर्ज, शेकाप महिला आघाडीच्या माधुरी गोसावी, माजी सभापती नरेश घरत, माजी सभापती ऍड.सागर कडू, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, भाजप नेते महेंद्र पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोट:
विकासाच्या दृष्टिकोनातून कामे करणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर जास्तीत जास्त भर दिला जाईल. शेतकरी कामगार पक्षाने दिलेल्या संधीबद्दल पक्षश्रेष्ठींचे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेतेमंडळींचे आभार मानते.
- सौ.समिधा निलेश म्हात्रे, सभापती उरण पंचायत समिती
Comments