पनवेल, दि. ९ (संजय कदम) ः मुंबई पोलीस दलात कार्यरत असणार्या एका महिला पोलीस शिपाईनेच तीचे पोलीस सहकार्याबरोबर झालेल्या वादातून त्याची हत्या करण्याची सुपारी देवून त्याची हत्या घडवून आणल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तीघा जणांना ताब्यात घेतले असून यांच्या अटकेमुळे अपघात झालेला गुन्हा हा दाखविला असतानाही पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून व मयत इसमाच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे खर्या गुन्ह्याला वाचा फुटली आहे.
पनवेल रेल्वे स्टेशन ते मालधक्का जाणार्या रस्त्यावर भगत चाळीसमोर मयत शिवाजी माधवराव सानप (54) कार्यरत मुंबई पोलीस यांना कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक मारल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते व त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक स्वरुपात मोटार अपघात म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला होता. परंतु या घटनेसंदर्भात सानप यांच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केला. तसेच पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून काही गोष्टी त्यांच्या समोर आल्याने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सह.पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा.पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यास सुरूवात केली. घटनास्थळ, परिसर व सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन, आलेले फोन, केलेले फोन व इतर तांत्रिक तपासाचा आधार घेवून व त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शिवाजी सानप हे रेल्वे स्थानकात उतरुन पायी जात असताना यातील आरोपी विशाल जाधव व गणेश चव्हाण उर्फ मुदावथ याने त्याच्या ताब्यातील नॅनो गाडीने जाणीवपूर्वक जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना जबर ठोकर मारुन गंभीर जखमा करून त्यांचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात वापरलेली नॅनो कार सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. सखोल तपासामध्ये शिवाजी सानप हे जेथे कार्यरत होते. त्या ठिकाणी महिला पोलीस शिपाई शितल पानसरे या सुद्धा कार्यरत होत्या. त्यांच्या दोघांमध्ये ओळख होती. परंतु त्यांच्यात झालेल्या वादाचा मनात राग धरुन सुड घेण्याच्या उद्देशाने आरोपी शितल पानसरे हिने तिच्या घरात घरकाम करणारा विशाल जाधव व त्याचा मित्र गणेश चव्हाण यांना पैसे देवून त्यांची मदत घेवून जीवे ठार मारण्याचा कट रचून तो यशस्वी केला. परंतु पोलिसांनी सखोल चौकशीद्वारे यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, पोनि विजय कादबाने, पोनि संजय जोशी, सपोनि देवळे, सपोनि, हुलगे, सपोनि पवार, सपोनि दळवी, पोउपनि फरताडे, पोहवा राउत, पोहवा वाघमारे, पोहवा गथडे, पोना म्हात्रे, पोशि खेडकर, पोना राठोड, पोना राउत, पोना पारासुर, पोना साळूखे, पोना देशमुख, पोना पाटील नमुद गुन्हयाचे मुळापर्यंत जावून अतिउत्कृष्ट तपास करुन चांगली कामगिरी केली आहे. याबाबत अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने पनवेल शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.