शासकीय नियम मोडणार्‍या बारवर कारवाया सुरू ; कोरोना प्रादुर्भाव वाढविणारे बार कायमस्वरुपी बंद करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी

पनवेल, दि.23 (संजय कदम) ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने पनवेलकरांनी हायसे घेतले असतानाच गेल्या 15 दिवसामध्ये बेकायदेशीररित्या व शासकीय नियम मोडून काही बार रात्री उशिरापर्यंत शासनाने दिलेल्या अटी व सुचनांचे पालन न करता सुरू असतात, अशा बारवर शासनाने कारवाई करून कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणी तालुक्यातील कोन व तळोजा परिसरातील नागरिक करीत आहेत.
तालुक्यातील कोन गावच्या हद्दीतील साई पॅलेस बारमध्ये शासनाने दिलेल्या कोविड 19 उपाय योजना 2020 मधील सुचनांचे पालन न करता त्याचे उल्लंघन करून तेथे गर्दी  जमवून त्यामुळे कोरोना विषाणू सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याची जाणीव असताना देखील हयगयीने व निष्काळजीपणे सदर बार सुरू ठेवून सदर बारमधील महिला वेटर या पुरुष ग्राहकांच्या समोर अश्‍लिल व बिर्भत्स वर्तन करीत असल्याचे माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.प्रशांत शिर्के, अविनाश पाळदे, पो.उप.भरत पाटील आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून या ठिकाणी एकूण 20 जणांवर त्यामध्ये कर्मचारी, मॅनेज व गिर्‍हाईक अशांवर भादवी 279, 188, 294 आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन कलम 51 ब अंतर्गत कारवाई केली आहे. 15 दिवसापूर्वीच या परिसरात असलेल्या टोपाझ बारवर सुद्धा अशा प्रकारे कारवाई  करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसानी तळोजा येथील चंद्रविलास बारवर देखील कारवाई करून एकूण 71 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही हे बार मालक बिनधास्तपणे शासकीय नियम पायदळी तुडवून आपले खिसे भरत आहेत व यामध्ये कोरोनामध्ये घ्यायच्या काळजी संदर्भात कुठलीही उपाय योजना करत नसल्याने व पूर्णपणे शासकीय नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने व यातूनच कोरोनाचा पुन्हा एकदा पनवेल परिसरात प्रादुर्भाव वाढू शकतो या भितीपोटी परिसरातील ग्रामस्थांनी व महिलांनी हे बार कायमस्वरुपी बंद करावेत अशी मागणी करीत आहेत.
Comments