पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह एका ढाब्यावर पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल जवळील भिंगारी गाव येथे असलेल्या कपल बार अॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या आदेशाचे पालन न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता तसेच तोंडाला मास्क न लावता या संसर्गजन्य गंभीर रोगाचा प्रादुर्भाव होतो याची माहिती असताना देखील त्याची काळजी न घेतल्याबद्दल व शासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणून तसेच काही महिला वेटर यांचे विहित नोकरनामे नसताना देखील बारमध्ये आढळून आल्याने या ठिकाणी असलेले वेटर, महिला वेटर, बार मॅनेजर व इतर व्यक्ती असे मिळून 29 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोळखे गाव हद्दीतील आयकॉन बार अॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 14 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिरढोण येथे असलेल्या संग्राम ढाबा या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे धडक कारवाई केल्यामुळे बेकायदेशीररित्या लेडीज बार चालविणार्यांचे व ढाबे चालविणार्यांचे धाबे दणाणले आहेत.