एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला तळोजा पोलिसांनी केले गजाआड .....
पनवेल, दि. 16 (संजय कदम) ः तळोजा फेज-1 मधील एटीएम सेंन्टरवर दरोडा टाकून त्यातील रक्कम लुटण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी दरोडा घालण्यासाठी लागणारी हत्यारे व इतर साहित्य असे मिळून 3 लाख 30 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. यांच्या अटकेमुळे पनवेलसह नवी मुंबई व मुंबई परिसरातील अनेक दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पनवेल जवळील तळोजा फेज-1 मधील सोमेश्वर बिल्डींगजवळ मारुती सुझुकी रिट्झ कारमधून काही जण आले होते. यावेळी सदर लुटारु हे तळोजा भागातील एटीएम तोडून त्यातील रोख रक्कम लुटण्याची तयारी करत होते. याचवेळी तळोजा पोलीस ठाण्यातील गस्त पथक सदर ठिकाणी आले असता, त्यांना सदर टोळीच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांच्यावर झडप घालून त्यांची धरपकड केली. यावेळी सर्व लुटारु अंधाराचा फायदा उचलत पळून जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ लोखंडी कोयता, विळा, कटावणी, चाकु, मिरची पुड, व इतर साहित्य असा मिळून जवळपास 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज आढळुन आला. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेले हत्यार व मारुती सुझुकी कार जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर दरोडा घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली. अटक केलेल्यामध्ये मसुब पाशा शेख (37), आदिल मुस्ताफा अन्सारी (28), इरसाद मुस्ताफा शेख (27), अब्दुल नदीम हसमी (24), नाझीम अस्लम शेख (26), प्रशांत रामसनई सिंग (21) व अरबान अरझन नईम अन्सारी (21) या सात जणांचा समावेश आहे. यांच्या अटकेमुळे अनेक गुन्हे दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.