तळोजा येथील वखार केंद्रातील अधिक्षकानेच केला ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या मालाचा अपहार .....
तळोजा येथील वखार केंद्रातील अधिक्षकानेच केला ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या मालाचा अपहार .....

पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः तळोजा येथील वखार केंद्रात कामाला असलेल्या अधिक्षकानेच निवृत्त होण्याच्या काही दिवसाआधी वखार केंद्रात ठेवलेला सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचा माल विनापरवानगी बाहेर काढून त्या मालाचा अपहार केल्याचे उघडकिस आले आहे. रमेश विधाते असे या अधिक्षकाचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्यांच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभाग अंतर्गत येणाऱया महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे तळोजा येथे वखार केंद्र असून या वखार केंद्रामध्ये विदेशातून आयात केलेला व कस्टम विभागाकडून जफ्त करण्यात आलेला वेगवेगळ्या प्रकारचा माल हा कस्टम डयुटी भरेपर्यंत ठेवण्यात येतो. सदर मालाचे भाडे आयातदाराकडुन वसुल केल्यानंतरच त्यांना त्यांचा माल देण्यात येतो. न्हावाशेवा कस्टम विभागाने 2005 मध्ये खोपोली येथील विप्रास कास्टींग लि.या कंपनीचा एस.एस.मॅग्नेटिक मेल्टींग कॅपचा ग्रेड 400 एस हा सुमारे 35 लाख रुपये किंमतीचा माल तळोजा वखार केंद्रामध्ये ठेवला होता. दरम्यान वखार केंद्राचे अधिक्षक रमेश विधाते हे सायंकाळी वखार केंद्रात गेले होते. त्यानंतर त्यांनी एका ट्रक मध्ये तेथील क्रॅपचा माल भरुन गेटपास न बनविता सदर माल बाहेर काढला. गत सप्टेंबर महिन्यात  वखार महामंडळाचे उप महाव्यवस्थापक किसन टोपे यांनी तळोजा वखार केंद्राची वार्षीक तपासणी केली असता, त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या मालापैकी क्रॅपचा माल कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे टोपे यांनी त्याबाबत सुरक्षा रक्षकांकडे  विचारणा केली असता, अधिक्षक रमेश विधाते यांनी सदरचा माल ट्रकमध्ये भरून नेल्याचे त्यांनी सांगितले. अधिक चौकशीत विधाते यांनी त्यापुर्वी देखील सदर क्रॅपचा माल गेट पास शिवाय नेल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली.  त्यानंतर उपमहाव्यवस्थापक टोपे यांनी रमेश विधाते यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी वखार महामंडळाला कोणतीही माहिती न देता, सदर कॅपचा माल ट्रकमध्ये भरून बाहेर काढल्याचे कबुल केले. त्यानंतर वखार महामंडळाकडून मालाची पडताळणी करण्यात आली असता, त्यातील सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 20 टन मालाचा अपहार झाल्याचे आढळुन आले. त्यानुसार उपमहाव्यवस्थापक टोपे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रमेश विधाते यांच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments