मिठाई खरेदी करताना सावधान ; भेसळयुक्त मिठाईची विक्री होण्याची शक्यता...
मिठाई खरेदी करताना सावधान ; भेसळयुक्त मिठाईची विक्री होण्याची शक्यता...

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः दिवाळी सणामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होत असते. परंतु ही मिठाई अनेक वेळा शरीराला घातक सुद्धा ठरू शकते. कमी दर्जाचा माल, मावा, साखर किंवा इतर पदार्थ यामुळे ही मिठाई अनेकांना त्रासदायक ठरणारी असते. तरी अशा मिठाईपासून सावध राहण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात येत आहे.
दिवाळी आणि मिठाई हे एक समीकरण बनले आहे.तसे पहायला गेले तर मिठाई नसेल तर कोणताही सण पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्यात दिवाळीत तर मिठाई आणि फराळाची अधिकच मजा असते. कोणताही सण असला की, खव्याची मोठी मागणी असते. त्यामुळे याच दिवसात खवा आणि मिठाईंमध्ये भेसळ करुन विक्री केली जाते. दिवाळीत अन्नपदार्थांची विक्री प्रचंड वाढते. तर याच वाढणार्‍या विक्रीचा फायदा भेसळखोर घेताना दिसतात. तेव्हा या अन्न पदार्थ भेसळीला रोखण्यासाठी, भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून खास दिवाळीदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाते.यावर्षी देखील या मोहिमेला सुरुवात झाली आहे.राज्यभर हि मोहीम एफडीए मार्फत राबविण्यात येत आहे.पनवेल मध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातुन सोमवार दि.25 तारखेपासुन हि मोहीम पनवेल मध्ये राबविण्यात येणार आहे.
गुळात कशाची भेसळ ?
दिवाळीत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते ही बाब हेरून भेसळ माफिया भेसळयुक्त मिठाई बनवितात. आरोग्याला घातक ठरू शकणारी मिठाई बाजारात आल्याने नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. दिवाळीतील मागणीचा विचार करून मोठ्या प्रमाणात मिठाई बनविली जात असतानाच त्यासाठी बनावट तसेच निकृष्ट दर्जाचा मावा वापरला जातो. विशेष म्हणजे हा मावा शेजारील गुजरात ,छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात नागपुरात दाखल होत आहे. ही भेसळ सहजासहजी ओळखता येत नसली तरी नागरिकांना संभाव्य धोका लक्षात घेत खात्रीशीर स्विट्सच्या दुकानातूच मिठाई खरेदी करावी लागणार आहे. मिठाईच्या क्षेत्रात नामवंत असलेल्या दुकानदारांकडूनही मिठाई घेतल्यास धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूकता दाखविणे हाच उपाय ठरतो. दिवाळीची मिठाई बनविताना दूषित आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. शिवाय मिठाई बनविणारे कारागीर आणि त्यांचे किचन अत्यंत गलिच्छ असल्याने दूषित मिठाईचा धोका अधिकच वाढतो.
कोण करतो ही भेसळ -
दिवाळीत मिठाईची मागणी लक्षात घेता जास्तीत जास्त खवा मागविला जातो.खव्याचा तुटवडा लक्षात घेता बनावट खवा बनावरी टोळी या काळात सक्रिय झालेली असते.शरीरास घातक असलेला हा खवा बहुतांशी वेळेला परराज्यातुन महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने आणला जातो.काही वेळेला याकरिता खाजगी वाहनांचा देखील वापर केला जातो.
ओळखायचे कसे ?-
-माव्याच्या तुकड्याला हातावर घेऊन अंगठ्यानी दाबून, चोळून पाहा. जर मावा चोळल्यानंतर तुपाचा वास येत असेल आणि बराचवेळ हा वास बोटांवर असेल तर समजून जा की, हा मावा शुद्ध आहे.
-माव्याचा एक लहान गोळा तयार करा आणि दोन्ही हातांच्यामध्ये गोल गोल फिरवा. जर फिरवत असताना हा गोळा फुटत असेल तर कदाचित हा मावा भेसळयुक्त असू शकतो.
-. तुम्ही मावा खाऊनही अस्सल मावा आणि भेसळयुक्त माव्यातील फरक ओळखू शकता. मावा खाल्यानंतर तोंडात चिकट चिकट वाटत असेल तर समजून जा की हा मावा खराब आहे. चांगला मावा खाल्यानंतर कच्च्या दुधाप्रमाणे वास येतो.
-बनावट माव्यामुळे तुमची पाचन क्रिया देखील खराब होते, ज्यामुळे पोटाचे इतर आजार होऊ शकतात.
दिवाळीच्या तोंडावरच कारवाईला सुरुवात -
सध्याच्या घडीला अद्याप मिठाईची मागणी वाढलेली नाही.त्यामुळे कारवाईच्या नावाखाली दुकानांवर छापे टाकल्यास जास्त काही हातात लागणार नाही.हीच कारवाई दिवाळीच्या तोंडावर केल्यास भेसळ युक्त बनावट मिठाई मोठ्या प्रमाणात हाती लागु शकते.दिवाळीत मोठ्या प्रमाणात मिठाईची मागणी जास्त असल्याने भेसळीचे प्रकार वाढत असल्याने दि.25 सोमवार पासुन आम्ही पनवेल सह आजूबाजूच्या परिसरात कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन रायगडचे सहआयुक्त लक्ष्मण दराडे यांनी दिली.
गणेशोत्सवापूर्वी आम्ही मिठाई विक्रेते ,हॉटेल्स चालकांच्या बैठका घेतल्या होत्या,त्यांना भेसळीबाबत योग्य त्या सूचना दिल्या होत्या.दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अशाप्रकारे बैठक घेतली जाणार आहे.दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मिठाई तसेच तेलाचे नमुने देखील तपासले जाणार आहेत.
-लक्ष्मण दराडे (सहआयुक्त ,अन्न व औषध प्रशासन ,रायगड )
Comments