महिलांवर होणार्‍या अत्याचार अन्याया विरोधात पोलिसांनी तात्काळ लक्ष घालण्याची क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशनची मागणी.....
महिलांवर होणार्‍या अत्याचार अन्याया विरोधात पोलिसांनी तात्काळ लक्ष घालण्याची क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशनची मागणी...
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसामध्ये महिलांवर होणारे अत्याचार अन्याय वाढले असून अनेक वेळा या संदर्भात महिला पोलीस ठाण्यात तक्रार घेवून गेल्या असता त्याची तातडीने दखल घेतली जात नाही. तर काही वेळा शासकीय कामात असलेल्या महिलांना सुद्धा अशा प्रकारच्या व्यक्तींपासून त्रास होत असतो. तरी या संदर्भात सर्वच पोलीस ठाण्यांना विशेष आदेश काढून अशा तक्रारदार महिलांसंदर्भात योग्य ती दखल घ्यावी व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्याकडे क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची भेट अध्यक्षा रुपालीताई शिंदे, उपाध्यक्षा रेश्मा सानप, सदस्या इंदू बगाटे, जरीना शेख, अस्मा शेख, राशिदा शेख, विद्या जाधव, जयश्री कांबळे आदींनी भेट घेवून महिलांवर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांनी परिमंडळ 2 चे उपायुक्त शिवराज पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. त्याचप्रमाणे अनेक वेळा शासकीय यंत्रणेत व खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना सुद्धा दमदाटी, शिवीगाळी, आक्षेपार्ह बोलणे आदीला सामोरे जावे लागते. कित्येक व्हॉटसअप व फेसबुकद्वारे अश्‍लिल मेसेज टाकण्यात येतात. या सर्व गोष्टींसंदर्भात प्रत्येक पोलीस ठाण्यात वेगळा कक्ष उभारण्यात यावा व अशा तक्रारी त्या ठिकाणी घेवून त्वरित संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी अध्यक्षा रुपालीताई शिंदे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी नुकतीच घडलेली एक घटना सुद्धा त्यांच्या समोर मांडली असता पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी त्वरित संबंधित पोलीस अधिकार्‍यांना फोन करून याबाबत तक्रार दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने उपस्थित शिष्ट मंडळाने समाधान व्यक्त केले आहे.

Comments