व्यापाऱ्यावर हल्ला करून १९ लाखांची रोकड लुटणाऱ्या त्रिकुटाचा शोध सुरू...
पनवेल दि. २९ (वार्ताहर)- एका सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्यावर 3 जणांनी हल्ला करून त्याच्याजवळ असलेली 19 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना पनवेल जवळील कामोठे बस थांब्याजवळ घडली असून त्या त्रिकुटाचा शोध पोलिसांची विविध पथके करीत आहेत.
व्यापारी संतोष जाधव (वय-38) यांची अंबेजोगाई येथे सोन्याची पेढी आहे. ते नेहमी मुंबई परिसरात येऊन सोन्या चांदीची खरेदी करून माल घेऊन जात असतात. अशाचप्रकारे ते मुंबई येथे सोने खरेदी करण्यासाठी एका खाजगी बसमधून कामोठे येथे खाली उतरले व ते त्यांची मैत्रीण बसलेल्या स्विफ्ट गाडीकडे जात असताना तीन अनोळखी इसमांनी संतोष जाधव यांच्या चेहऱ्यावर हाताने मिरची पूड लावून त्यांच्या पाठीवर असलेली 19 लाख रुपये रोख रक्कमेची बॅग व जिम बॅग ओढायला लागले. त्यांना जाधव यांनी विरोध करताच त्या त्रिकुटाने त्यांच्या कडे असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर, हातावर, बरगड्यांवर वार करून त्यांच्या जवळ असलेली 19 लाखांची रोकड घेऊन ते पसार झाले. जाधव यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अति.पोलिस आयुक्त महेश घुर्ये, पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहायक पोलिस आयुक्त भागवत सोनावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कामोठे स्मिता जाधव यांच्या सह गुन्हे शाखेची विविध पथके घटनास्थळी रवाना झाली होती. प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या व्यक्ती व त्यांनी दिलेली माहिती, परिसरातील सिसिटिव्हि फुटेज व इतर तांत्रिक तपासाद्वारे या त्रिकुटाचा शोध पोलिसांची पथके घेत आहेत.