तरुणाला ऑनलाईन सव्वा तीन लाखांचा गंडा...
तरुणाला ऑनलाईन सव्वा तीन लाखांचा गंडा...

पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः  ई-कॉमर्स मार्केटींग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एका सायबर गुन्हेगाराने उलवे भागातील तरुणाकडून बँकेची संपूर्ण माहिती मिळवून त्याद्वारे त्याच्या दोन बँकेत जमा असलेली तब्बल सव्वा तीन लाख रुपयांची रक्कम परस्पर दुसर्‍या खात्यात वळती करुन त्याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी या प्रकरणी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणात फसवणूक झालेला त्रिदीवेश सातोपती (31) उलवे, सेक्टर-9 मध्ये राहण्यास असून तो एका आयटी कंपनीत कामाला आहे. त्रिदीवेश याच्या व्हॉटस्अ‍ॅपवर एका अज्ञात व्यक्तीने पार्ट टाईम जॉबबाबत जाहिरात पाठविली होती. त्यात 5 हजार रुपये ई-कॉमर्स मार्केटींगमध्ये गुंतवणूक केल्यास रोज 600 ते 900 रुपये मिळतील, अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्रिदीवेश याने सदरच्या योजनेत गुंतवणूक करण्याची तयारी दाखविल्यानंतर समोरील व्यक्तीने त्रिदीवेशला एक लिंक पाठवून त्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार त्रिदीवेशने सदर लिकंवर युपीआय मार्फत 4600 रुपये भरल्यानंतर दोन तासात त्याला परतावा मिळणार असल्याचे सांगून त्याला बँक अकाऊंटची माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्रिदीवेशने आपल्या बँक खात्याची माहिती भरल्यानंतर सायबर गुन्हेगाराने त्याच्या अकाऊंटमध्ये चार टप्प्यात एकूण 4198 रुपयांची रक्कम त्याला पाठवून दिली. त्यानंतर सायबर गुन्हेगाराकडून पैसे कसे कमवायचे याची माहिती व्हॉटस्अ‍ॅपद्वारे देण्यात येत असताना, त्रिदीवेशने आपण कोण आहात अशी विचारणा केली. यानंतर सायबर गुन्हेगाराने इंदिरा इलुमलाई अचारी या महिलेचे पॅनकार्ड व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवून दिले. दोन दिवसानंतर त्रिदीवेश, किराणा दुकानादाराला ऑनलाईन पैसे पाठविण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या फोन-पेमध्ये पैसे नसल्याचे त्याला सांगण्यात येत होते. त्यामुळे त्याने आपल्या दोन्ही बँकेच्या खात्यांची तपासणी केली असता, त्याच्या बँक ऑफ इंडियाच्या अकाऊंट मधून 1 लाख 14 हजार रुपये तर एचडीएफसी बँकेमधून 2 लाख 11 हजार रुपये असे एकूण सव्वा तीन लाख रुपये काढून घेण्यात आल्याचे त्याला समजले. त्यानंतर व्हॉटस्अ‍ॅपवरुन गुंतवणुकीचे आमिष दाखवणार्‍या सायबर गुन्हेगाराच्या मोबाईलवर त्रिदीवेशने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्रिदीवेश याने न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
Comments