पनवेलमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.सुनील तटकरेंची प्रमुख उपस्थिती
पनवेल:
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढवणारच आहोत. राष्ट्रवादीत इतर पक्षातून अनेकजण पक्षप्रवेश करीत आहेत. त्यातच सुदाम पाटील यांच्या सारख्या अनुभवी कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होताना अत्यानंद होत आहे. त्यांना राष्ट्रवादीत नक्कीच मानाचे स्थान मिळेल अशी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे सुदाम पाटील यांच्यासह पनवेलमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश यामुळे पनवेल परिसरात पक्षाला अधिक बळकटी मिळेल व पक्ष संघटन मजबूत होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात पनवेलमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
यावेळी काँग्रेसच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष शशिकला सिंह, जिल्हा कार्याध्यक्ष ताहीर पटेल, मजदूर सेल जिल्हाध्यक्ष अमित लोखंडे, सेवादल महिला जिल्हाध्यक्ष सुदेशना रायते, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा अध्यक्ष विनीत कांडपिळे, कळंबोली महिला ब्लॉक अध्यक्षा जयश्री खटकले, नरेश कुमारी मेहमी, वीर सिंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पनवेलचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्याच बरोबरीने नागरिकांचे विविध प्रश्नही प्रलंबित आहेत. जनतेने पनवेल महापालिकेत सत्ताधारी भाजपला एकहाती कौल दिला असला तरीही त्यांनी अद्यापही जनतेचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास होत आहे. यासाठी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून यश संपादन करून नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवावेत अशा सूचनाही जयंत पाटील यांनी प्रवेशकर्त्यांना दिल्या.
रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अत्यंत प्रभावीपणे रायगडचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन रायगडमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा झंझावात वाढत आहे. सुदाम पाटील यांचा राष्ट्रवादीत योग्य सन्मान करण्यात येईल व त्यांच्या बरोबरीने प्रवेश केलेल्या सर्वांनाच मानाचे स्थान मिळेल. लवकरच सुदाम पाटील यांना प्रदेश कार्यकारिणीत पद देण्यात येणार असल्याचे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
खासदार सुनील तटकरे यावेळी बोलताना म्हणाले की, पनवेल- उरणमधील आगामी सर्व निवडणुका आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढू. पनवेल महापालिका भाजपच्या ताब्यातून महाविकास आघाडीकडे घेण्याचा ठाम निर्धार केलेला आहे. लवकरच पनवेलमध्ये मोठ्या संख्येने पक्षमेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रवेशकर्त्यांना दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी कार्यकारी जिल्हा अध्यक्ष शिवदास कांबळे, नगरसेवक विजय खानावकर, विजय मयेकर, पनवेल विधानसभा अध्यक्ष दर्शन ठाकूर यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट:
काँग्रेस पक्षात कोणत्याही पद्धतीचा अन्याय झाला नाही किंवा कधीही अन्यायकारक वागणूक मिळाली नाही. परंतु रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून पक्षसंघटन वाढीसाठी व पनवेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सदैव तत्पर राहीन. लवकरच भाजप व काँग्रेसमधील आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा विश्वास आहे.
- सुदाम पाटील