अनोळखी महिलेवर विश्‍वास ठेवून गोल्ड स्किममध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यावसायीकाला ९ लाख ७८ हजारांचा गंडा, अज्ञात महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु...
अनोळखी महिलेवर विश्‍वास ठेवून गोल्ड स्किममध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यावसायीकाला ९ लाख ७८ हजारांचा गंडा, अज्ञात महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु...   

पनवेल, दि. 23 (वार्ताहर) ः गोल्ड स्किममध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून एका महिलेने कोपरखैरणेत रहाणाऱया एका व्यावसायीकाला तब्बल 9 लाख 78 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकिस आले आहे. 
कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरु केला आहे.    
या घटनेत फसवणुक झालेले व्यावसायिक साईनाथ रमण (45) हे कोरपखैरणे सेक्टर-20 मध्ये कुटुंबासह रहाण्यास आहेत. गत ऑगस्ट महिन्यामध्ये साईनाथ रमण हे  सायंकाळी आपल्या घरी असताना, ऍमी नावाच्या महिलेने साईनाथ यांना व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवुन, जतीन नावाच्या व्यक्तीला ओळखता का? अशी विचारणा केली. त्यानंतर सदर महिलेने साईनाथ यांच्या सोबत सर्वसाधारण चर्चा करताना, ती मलेशीया देशातून बोलत असल्याचे व ती स्वत: गोल्ड ऍनालिस्ट असल्याचे साईनाथ यांना सांगितले. त्यानंतर ऍनीने कोरोना काळात खुप लोकांचे नुकसान झाल्याची चर्चा करुन तिच्याकडे चांगली स्किम असल्याचे व त्या स्किममध्ये पैसे गुंतवल्यास चांगल्या प्रकारे फायदा मिळेल असे अमिष दाखविले. त्यानंतर ऍमीने साईनाथ यांच्यासोबत पाच दिवस व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क ठेवला.  यादरम्यान ऍमीने गोल्ड स्कीम मध्ये फायदा मिळालेल्या व्यक्तींची यादी सुद्धा साईनाथ यांना पाठवून देत त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर ऍमीने साईनाथ यांना लिंक पाठवून त्यात संपुर्ण वैयक्तीक माहिती भरण्यास तसेच 50 हजार रुपये गुंतवणूक करण्यास सागितले. त्यानुसार साईनाथ यांनी ऍमीने पाठविलेली लिंक ओपन करुन त्यात आपली सर्व वैयक्तीक माहिती भरुन त्यात 50 हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर साईनाथ यांनी दिड महिन्याच्या कालावधीत ऍमीने सांगितल्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल 9 लाख 78 हजार रुपये पाठवून दिले. या कालावधीत ऍमीने चार मोबाईल फोनचा वापर करुन साईनाथ यांच्याशी संपर्क ठेवला. यादरम्यान, कुठल्याही प्रकारचा परतावा न मिळाल्याने साईनाथ यांनी गत ऑक्टोबर महिन्यांमध्ये साईनाथ यांनी ऍमीच्या चारही मोबाईल फोनवर संपर्क साधला.  मात्र तिचे चारही मोबाईल फोन बंद असल्याचे तसेच ऍमीने दिलेले वेबसाईट सुद्धा बंद असल्याचे आढळुन आले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे साईनाथ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नॅशनल सायबर क्राईमच्या पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी या घटनेतील महिलेविरोधात फसवणुकिसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
Comments