कमिशनच्या अमिषापोटी तरुणाने गमावले १०.१८ लाख ...
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पेडोंरा अॅपच्या माध्यमातून घरी बसल्या नोकरी करुन जास्त लाभ मिळविण्याचे आमिष दाखवून एका सायबर चोरट्याने पनवेलच्या डेरवली येथील एका तरुणाला तब्बल 10 लाख 18 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेत फसवणूक झालेला तरुण सनाऊल्ला जबीउल्ला खान (25) मुंब्रा येथे राहण्यास असून त्याचा पनवेल मधील डेरवली येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सनाऊल्ला खान पनवेल येथील आपल्या कामावर हजर असताना अज्ञात सायबर चोरट्याने विनीता या महिलेच्या नावाने त्याला घरी बसून नोकरी करा आणि मिळणार्या लाभाचा फायदा घ्या, अशा प्रकारचा व्हॉटस्अॅपवरुन मेसेज पाठविला. सदर मेसेजला सनाऊल्ला खान याने प्रतिसाद दिल्यानंतर सायबर चोरट्याने त्याला एक लिंक पाठवून दिली. सदर लिंक उघडण्यात आल्यानंतर पॅडोंरा नावाचे अॅप सुरु झाल्याचे आणि त्यात 88 रुपये शिल्लक असल्याचे सनाऊल्ला याच्या निदर्शनास आले. त्यानंतर सायबर चोरट्याने सांगितल्यानुसार सनाऊल्ला याने 200 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर सदर अॅपवर 360 रुपयांच्या तीन खरेदीच्या ऑर्डर त्याला प्राप्त झाल्या. सदर खरेदीवर कमिशन म्हणून 54 रुपये मिळणार असल्याने सनाऊल्ला याने सदर ऑर्डर खरेदी केल्या. त्यानंतर त्याच्या पॅडोंरा अॅपच्या अकाऊंटवर खरेदी किंमतीसह 54 रुपये कमिशन जमा झाले. यानंतर सायबर चोरट्याकडून सनाऊल्ला याला मोठ्या रक्कमेच्या ऑर्डर पाठवून त्या खरेदी केल्यानंतर त्याच्या पॅडोंरा अकाऊंटमध्ये मोठी रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. त्याच्या खात्यात 52 हजार रुपयांची रक्कम जमा झाल्यानंतर सायबर चोरट्याकडून त्याला कमिशनची रक्कम काढून घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे सनाऊल्ला याने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर रक्कम न निघाल्याने सायबर चोरट्याने त्याला कमिशनच्या रक्कमेच्या 50 टक्के रक्कम अकाऊंटवर रिचार्ज करण्यास सांगितले. त्यानंतर देखील सदर रक्कम त्याला काढता येत नव्हती. दुसरीकडे मोठमोठ्या रक्कमेच्या ऑर्डर पाठवून त्याला त्या खरेदी करण्यास भाग पाडायचे आणि त्याच्या खात्यात कमिशन म्हणून मोठी रक्कम दाखवायची. अशा पध्दतीने सायबर चोरट्याने सनाऊल्ला याच्या पॅडोंरा खात्यात 18 लाख रुपये कमिशन जमा झाल्याचे दाखवले. मात्र, सदर रक्कम काढण्यासाठी गेल्यास त्याला 25 ते 30 टक्के रक्कम भरण्यासाठी सांगितले जायचे. अशा पध्दतीने सनाऊल्ला खान याने कमिशनची रक्कम काढण्यासाठी तब्बल 10 लाख 18 हजार रुपयांची रक्कम पॅडोंरा अकाऊंटमध्ये भरली. तरीही कमिशनची रक्कम निघत नसल्याने त्याने सायबर चोरट्याच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने राँग नंबर असल्याचे सांगून फोन बंद केला. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर सनाऊल्ला खान याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.