खारघर मध्ये घनकचरा व्यवस्थापन, वर्गीकरण कार्यशाळा संपन्न....
पनवेल, दि. ४ (वार्ताहर) : - खारघर येथील रघुनाथ विहार याठिकाणी घनकचरा व्यवस्थापन, वर्गीकरण बाबत कार्यशाळा घेण्यात आली. निसर्ग हिच खरी संपत्ती आहे. निसर्गाचे जतन करणे, इतकाच एकमेव पर्याय माणसाकडे उपलब्ध आहे. दैनंदिन जीवनात निर्माण होणार्या कचर्यांपैकी 30 टक्के कचरा स्वयंपाक घरातील आणि वाया गेलेल्या अन्नाचा असतो. त्यामुळे अन्न वाया न घालवण्याचे संस्कार प्रत्येक गृहिणीने आपल्या पाल्यांना दिले तर कचरा उत्पत्ती कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन निसर्गगुण या बायोगॅस् संयंत्राचे जनक आणि भाभा ऑटोमिक संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी या कार्यशाळेत केले.
या कार्यशाळेत पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, कल्याण-डोंबिवली महापालिका उपायुक्त रामदास कोकरे, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील तसेच महापालिका अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. काळे म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापन आज काळाची गरज बनली आहे. मानवाच्या मुलभूत गरजांमध्ये घनकचरा व्यवस्थापन सुध्दा एक भाग बनली आहे. घरामध्ये दैंनदिन निर्माण होणारा कचरा घराबाहेर जाणार नाही, याची दक्षता प्रत्येक गृहिणीने घेतली पाहिजे, असेही यावेळी डॉ. शरद काळे यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-2022’ची प्रभावी अमंलबजावणी पनवेल महापालिका क्षेत्रात सुरु आहे. या अंतर्गत जनजागृतीपर घनकचरा व्यवस्थापन, वर्गीकरण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती यावेळी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.