रेल्वे मार्गावरील कॉपर केबलची चोरी ; लोकलसेवा विस्कळीत...
रेल्वे मार्गावरील कॉपर केबलची चोरी ; लोकलसेवा विस्कळीत...

पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः अज्ञात चोरट्याने हार्बर रेल्वे मार्गावरील सीबीडी- खारघर रेल्वे स्टेशन दरम्यान असलेली 3 मीटरची कॉपर केबल कापून चोरुन नेल्याने रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड होऊन पनवेलच्या दिशेने जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे पनवेल रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळालगत असलेली कॉपर केबल चोरुन नेणार्‍या अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
सीएसएमटी-पनवेल लोकल सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानकात आल्यानंतर सदरची लोकल फलाट व्रं.1 वर बराच वेळ थांबली. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी तपासणी केली असता, बेलापूर ते खारघर रेल्वे स्टेशन दरम्यान पॉईंट नं.108 जवळ कॉपर केबल चोरी झाल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणार्‍या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे आढळून आले. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी रेल्वे रुळाजवळ जाऊन शोध घेतला असता, अज्ञात चोरट्याने तेथे असलेली 3 मीटरची कॉपर केबल चोरुन नेल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर मार्गावरील सिग्नल यंत्रणा बिघडून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पनवेल रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Comments