आपले कर्तव्य बजाविताना प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे- पोलिस उप अधिक्षक अजयकुमार लांडगे
पनवेल, दि.7 (संजय कदम)- पनवेल शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना बढती मिळून त्यांची पोलिस उप अधिक्षक नक्षलविरोधी अभियान नागपूर येथे बदली झाल्याने पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या वतीने त्यांना अधिकारी व कर्मचारी वर्गाने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आपले कर्तव्य बजाविताना प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे.
यावेळी पोलिस उप अधिक्षक अजयकुमार लांडगे यांच्या निरोप समारंभासाठी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय जोशी यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांना वपोनि विजय कादबाने यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमात अजयकुमार लांडगे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला. त्याचप्रमाणे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस उप अधिक्षक अजयकुमार लांडगे यांनीसुद्धा आत्तापर्यंत केलेल्या पोलिस खात्यातील कामामध्ये आलेले वेगवेगळे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. तसेच आपले कर्तव्य बजाविताना प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जीवनात आव्हान स्विकारणे महत्वाचे आहे. कामात चुकारपणा न करता ते आपले कर्तव्य आहे हे समजून करावे असेही त्यांनी सांगितले.
फोटोः पोलिस उप अधिक्षक अजयकुमार लांडगे यांच्या निरोप समारंभा निमित्त उपस्थित इतर अधिकारी