५ वर्षापासून बेपत्ता असलेल्या मुलाला खांदेश्वर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे काढले शोधून...
पनवेल, दि.22 (संजय कदम) ः पनवेल येथून गेल्या 5 वर्षापासून किरकोळ वादातून घर सोडून गेलेल्या मुलाला खांदेश्वर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून मुंबई खार येथून शोधून काढल्याने खांदेश्वर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
कुशल कृष्णा ठाकूर (23) हा मुलगा घरातील कौटुंबिक कलहामुळे घर सोडून गेला होता. याबाबतची तक्रार त्याच्या वडिलांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. त्याने घरातून निघून जाताना कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढणे पोलिसांसमोर आवाहन होते. परंतु या आवाहनाचा स्वीकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी केला व संबंधित मुलाचा शोध घेण्याची कामगिरी पो.नि.श्रीमती.वैभवी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा.पो.निरीक्षक प्रवीण पांडे, पो.हवा.सुदर्शन सारंग, पो.शि.प्रवीण पाटील व पथकावर टाकली. सदर मुलाच्या पॅनकार्डवरुन त्याच्या बँक अकाऊंटची माहिती प्राप्त करून घेण्यात आली. त्यावरुन अकाऊंट ओपनिंग फॉर्म प्राप्त करून त्याचा मोबाईल क्रमांक मिळविण्यात आला. सदर मोबाईल क्रमांकावर नमूद प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असता सदर मुलगा हा वारंवार मोबाईल फोन बंद-चालू करीत होता. तसेच राहण्याचे ठिकाणही सातत्याने बदलत होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे दिवसेंदिवस कठीण होत होते. परंतु त्यातही कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास सुरू ठेवून हा मुलगा खार परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाल्याने या पथकाने सदर ठिकाणी जावून त्याला ताब्यात घेवून त्याच्या आईवडिलांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आई वडिलांनी अत्यंत आनंद व्यक्त करून खांदेश्वर पोलिसांचे आभार मानले आहेत.