बनावट नावाने कॅमेरा घेऊन केली फसवणूक..
बनावट नावाने कॅमेरा घेऊन केली फसवणूक

पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः  बनावट कागदपत्र तयार करून तो कॅमेरा अन्य व्यक्तीला परस्पर देऊन फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. आरोपी मयुर विलास शिंदे (वय 24) ऊर्फ राहुल रत्नाकर आटपाडकर यांच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्टर 12, खारघर प्रेरणा सोसायटी येथील अजित सरोज यांचा कॅमेरा भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. मयुर विलास शिंदे हा त्यांच्याकडे कॅमेरा भाड्याने घेण्यासाठी आला. मयूर शिंदे याने त्यांना राहुल आटपाडकर असे नाव व पत्ता असलेले कागदपत्र दिले. त्यामुळे अजित यांनी एक दिवसाकरता मयूर शिंदे यास कॅमेरा भाड्याने दिला. यावेळी त्याच्याकडील आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल घेतले. दुसर्‍या दिवशी कॅमेरा घेऊन मयुर परत आला नाही, त्याला फोन केला असता त्याचा फोन बंद आला. त्यामुळे त्याने दिलेल्या पत्त्यावर अजित गेले असता राहुल नावाचा इसम त्या ठिकाणी राहत नसल्याचे त्यांना समजले. यावेळी मयूर शिंदे यांचा फोटो त्याच्या मित्रांना दाखवला असता तो धरणा कॅम्प, तळोजा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अजित हे त्याच्या घरी गेले असता त्याच्याकडे कॅमेराबाबत विचारपूस केली. यावेळी त्याने कॅमेरा त्याचा मित्र सिद्धू माथुर (सेक्टर 10, कोपरागाव) याच्याकडे असल्याचे सांगितले. अजित हे कोपरा गावात गेले असता तो सापडून आला नाही. त्यामुळे मयुर विलास शिंदे उर्फ राहुल रत्नकर आटपाडकर याने खोटी कागदपत्रे तयार करून कॅमेरा घेऊन फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Comments