ट्रव्हल गाईड प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन...
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः कोकणतील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहचावी तसेच कोकणातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोकण विभागाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयामार्फत ट्रव्हल गाईड (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील पर्यटनस्थळांबाबतचा इतिहास व सविस्तर माहिती पर्यटकांना मिळावी, तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड, मुरबाड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा सात ठिकाणी ट्रव्हल गाईड (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी किमान 18 वर्षे वयोमार्यादा असून ज्यांचे वय 40 वर्षांच्या आत आहे, अशा अर्जदारांची शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर ज्यांचे वय 40 वर्षांच्या वर आहे अशा अर्जदारांची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
इच्छुकांनी https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर भेट देऊन 31 डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱया प्रशिक्षणार्थींना भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन (Indian Institute of Tourism and Travel Management) संस्थेच्या सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा याबाबत उपाययोजना, पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा, पर्यटकांशी संवाद साधतांना पर्यटनस्थळाबाबतची माहिती गोष्टीरुपाने कशी मांडावी, असे विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षणार्थींना प्रात्याक्षिक मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून, हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड (पर्यटन मार्गदर्शक) म्हाणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाव्दारे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे मान्यताप्राफ्त टूर गाईड (पर्यटन मार्गदर्शक) बनण्यासाठीच्या सुवर्णसंधीचा कोकणातील स्थानिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन कोकण विभाग पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.