शिवसेना नवीन पनवेल उपशहरप्रमुख पदी ज्ञानेश्वर भंडारी यांची नियुक्ती....
पनवेल वैभव : (राज भंडारी)
नवीन पनवेलमध्ये शिवसेनेने मुसंडी मारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ४ महिन्यांमध्ये भव्यदिव्य असे ४ पक्षप्रवेश सोहळ्याचे कार्यक्रम नवीन पनवेल शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आले. त्यातच जुन्या नव्या कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या सोपविण्याच्या दृष्टिकोनातून पदे वाटण्यात आली. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल उपशहर प्रमुख पदी ज्ञानेश्वर भंडारी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख, शिवसैनिक संदीप तांडेल. सतीश गायकर आदी पदाधिकाऱ्यांनी नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयात भंडारी यांना पक्षवाढीच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना करून त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एके काळी बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्रातील जनतेने आपल्या हृदयावर कोरली. गाव खेड्यांमधून शिवसैनिक तयार झाले. महाराष्ट्र नव्हे तर शिवसेना देशासह जगात पोहोचली. नुकतेच महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचे खासदार निवडून येवू लागलेत आणि हीच स्फूर्ती आता महाराष्ट्रातील नव्या पिढीचा उत्साह वाढवीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्याला शिवसेनेची झळाळी येवू लागली आहे. अनेक पक्षातील नामवंत पदाधिकारी आता शिवसेनेचे शिवबंधन आपल्या मनगटावर बांधून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील नव्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना उचित पदे बहाल करण्याचे काम पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल आणि उपमहानगरप्रमुख यतीन देशमुख हे करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या या दोन नेत्यांनी पनवेल शहरासह परिसरातील असंख्य नागरिकांना शिवसेनेत आणण्याचे योगदान दिले आहे. प्रामाणिक काम कसे करावे हे या दोन्ही नेत्यांनी एकसंघ राहून दाखवून दिले. येत्या काही महिन्यात पनवेल महानगरपालिका निवडणूका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे पालिका हद्दीतील शिवसेनेची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना आता जोमाने कामाला लागली आहे. यावेळी काही जुन्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये बदल होण्याची शक्यता शिवसेनेच्या गोटात वर्तविली जात असली तरी जिल्हाप्रमुख शिरीष घरत याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच शिवसैनिकांमध्ये असलेले वातावरण पालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व सिद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून उपयोगी पडणारे असल्याचेच या नियुक्तीकरणावरून समोर येत आहे.