एक गाव एक संघ संकल्पनेतून पालेबुदृकमध्ये क्रिकेटचा थरार....
एक गाव एक संघ संकल्पनेतून पालेबुदृकमध्ये क्रिकेटचा थरार....
शिवसेना तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्याहस्ते क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन
पनवेल वैभव वृत्तसेवा : 
तालुक्यातील पालेबुदृक येथील पालेश्वरी क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ यांच्यामार्फत एक गाव एक संघ या संकल्पनेतून भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन शुक्रवार दिनांक १० डिसेंबर पासून सलग ४ दिवस असे आयोजित करण्यात आले आहे. या सामन्यांचा उद्घाटन सोहळा शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्याहस्ते आज सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

४ दिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण ३२ संघांचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यांमध्ये प्रथम येणाऱ्या संघास ५० हजार रुपये आणि भव्य चषक तसेच द्वितीय संघास २५ हजार रुपये आणि भव्य चषक, तृतीय आणि चतुर्थ संघास १२ हजार ५०० रुपये आणि चषक देवून गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीर खेळाडूंना योग्य बक्षिसे देवून गौरविण्यात येणार आहे. या सामन्यांसाठी एक गाव एक संघ या संकल्पनेतून आलेल्या संघांमधील ३२ संघांची निवड केली गेली आहे. 

यावेळी शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, प्रत्येक खेड्यांमध्ये असलेल्या क्रीडारसिकांमधून नवनवीन खेळाडू तयार होत असतात, त्यांच्या उत्साहाला शाबासकीची जोड देण्याचे काम आपण करायचे असते. यामधून उत्तम प्रकारचे खेळाडू तयार होण्यास वेळ लागत नाही. आज पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर क्रिकेटचे सामने उत्साहात पार पडत असतात. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एक खेळ म्हणूनच खेळाडूंकडून खेळ होत असल्यामुळे या सर्व खेळाडूंचे मी स्वागत करतो. येणारे चार दिवस या स्पर्धा सुरू असून खेळाडूंनी उत्तम प्रकारे खेळाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकावी असे आवाहन याद्वारे करताना मला आनंद होत आहे. यावेळी योगेश तांडेल यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments