नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती - प्रा.एल.बी. पाटील
नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती -  प्रा.एल.बी. पाटील 

पनवेल - नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती होऊ शकते असे मत रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी नवलेखक, कविता लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याच्या अध्यक्ष सुधीर शेठ होते.
       रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी स्मारक येथे झालेल्या नवलेखक,कविता लेखन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
           महाराष्ट्र राज्य साहित्य आणि  संस्कृती मंडळ मुंबई आणि कोकण मराठी साहित्य परिषद उरण-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या या कार्यशाळेच्या कार्यक्रमास  कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी अ.वि. जंगम,संजय गुंजाळ,गणेश कोळी,अॅड.गोपाळ शेळके,सुखद राणे तसेच शिवव्याख्याते प्रशांत देशमुख उपस्थित होते.
     यापुढे बोलताना प्रा.एल.बी. पाटील यांनी, नवोदित साहित्यिकांनी साहित्य निर्मिती केली पाहिजे. साहित्यातून मराठी भाषेचे संवर्धन होते.कोकण मराठी साहित्य परिषदेने अनेक साहित्यिक घडले आहेत असे सांगितले.
     कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर शेठ यांनी आपल्या भाषणात, नवोदित साहित्यिकांकडून समाज मनाची आंदोलने झाली पाहिजेत. साहित्य निर्मिती करताना ती सक्षम असली पाहिजे. साहित्यिक कार्यक्रमातून कवींच्या कवींवर संस्कारांचे मार्गदर्शन झाले पाहिजे असे सांगितले.
     यावेळी झालेल्या अभिजात मराठी भाषा या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, प्रशासकीय अधिकारी संजय माने यांनी सहभाग घेतला. बोली भाषेतील कविता या झालेल्या चर्चासत्रात डॉ. राजेंद्र राठोड, कवी नामदेव बरतोड,अरुण इंगोले, संध्या देवकर यांनी सहभाग घेतला.
          तसेच कविता कशी स्फुरते? या झालेल्या चर्चासत्रात गझलकार ज्योत्स्ना रजपूत, कवी अजित शेडगे, गंगाधर पालवी सहभाग घेतला. शेवटी कवींच्या रचना या झालेल्या कविसंमेलनात सहभागी ४३ कवींनी आपल्या कविता सादर केल्या, त्यांना संयोजकांच्यावतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बारटक्के यांनी केले.
Comments