पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे जागतिक किर्तीच्या विजेत्यांचा सन्मान..
पनवेल/ (प्रतिनिधी): मराठी भाषेतील आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 ला दर्पण हे नियतकालिक सुरू केलं, त्याचे स्मरण म्हणून दि. 6 जानेवारी हा दिवस देशभरात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून अपंगत्वावर यशस्वीरीत्या मात केलेल्या जागतिक किर्तीच्या विजेत्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नवीन पनवेल येथील के.आ. बांठीया विद्यालयाच्या सभागृहात पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर, के.आ. बांठीया विद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद जोशी, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी शॉर्टेस्ट बॉडी बिल्डर स्पर्धेत रायगड भूषण, अलिबाग भूषण, भारत श्री यासारख्या विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश मिळवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या प्रतिक विठ्ठल मोहिते यांचा तसेच अलिबाग झिराड श्री, पुणे ज्युनिअर महाराष्ट्र श्री, पनवेल महापौर श्री, भारत श्री, दिव्यांग भूषण, वीर जिजामाता पुरस्कार सन्मानित कनकेश्वर पांडुरंग रसाळ तर स्वमग्नतेवर मात करून 30 पेक्षा अधिक शिष्यवृत्ती संपादन करून 10 वी इयत्तेत 91% गुण, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परिक्षेत अपंगांमध्ये देशात पहिला, गणित विषयात मास्टर पदवी असे नेत्रदिपक यश संपादन करून गणित विषयात पी.एच.डी. करण्याचा मानस असलेल्या जतिन सुरेश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे म्हणाले की, कुटुंब प्रमुख चांगला असला की घर चांगले असते, त्याप्रमाणे या पत्रकार महासंघाचे कुटुंब चांगले आहे. या संघाला प्रमोद वालेकर यांच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांचे पाठबळ आहे, त्यामुळे हे कुटुंब तोडायचा कोणीही प्रयत्न करू शकणार नाही आणि होणार ही नाही, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केले.
यावेळी त्यांनी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाले की, नेहमी निमंत्रण पत्रिकेत अध्यक्षांचे नाव वर असते, पण या पत्रिकेत ज्येष्ठांचे नाव वरती लिहिले गेले आहे, याचेच कौतुक करून प्रीतम म्हात्रे यांनी यातूनच ज्येष्ठांना मान द्यायचे आपण शिकलो पाहिजे असे सांगून कोरोनाच्या काळात काळजी घेणे आवश्यक असले तरी असेही कार्यक्रम होणे गरजेचे असते. आज पत्रकार महासंघाने आमच्या सारख्यांचा सत्कार केला, त्याचबरोबर ज्या त्रिमूर्तीचा सत्कार करून त्यांना पुढे आणले, त्यामुळे नायक सिनेमाची आठवण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, समाजात काहीजण बोलतात पत्रकार हे पैशासाठी काम करत असतात, पण त्यांना हे कळत नाही की, त्यांच्या बातम्यांमुळे कोणाच्या चोर्या पकडल्या जातात, कोणाच्या आयुष्याचे भले होते, हे कधी कोणाला कळत नाही. ज्यावेळी आपण घरात सण साजरे करीत असतो त्यावेळी पोलिस आपले रक्षण करीत असतात, त्याप्रमाणे पत्रकारही सणासुदीला कोठेतरी बातमी कव्हरेज करीत किवा फोटो काढत असतात. त्यामुळेच त्या दोघांमध्ये कोठे तरी साम्य असल्याचे दिसते. यावेळी त्यांनी आपल्या सोबत मुंबईत घडलेला किस्सा सांगून आपल्या हस्ते आज सन्माननीय पत्रकारांचा सत्कार होणे हे माझे भाग्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी के.आ.बांठीया विद्यालयाचे प्राचार्य भगवान माळी म्हणाले की, मोठ्या वर्तमानपत्रात प्रत्येक पानावर काय हे ठरलेले असते. पण आता बातम्यांची पध्दत बदलली आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा जमाना आला आहे. जगाच्या कानाकोपर्यातील बातम्या काही सेकंदात लाईव्ह आपल्या मोबाईलमध्ये पहाता येतात. त्यावेळी प्रश्न पडतो हे एवढ्या कानाकोपर्यात कसे पोहचतात, यावर विश्वास बसत नाही. म्हणूनच पत्रकार बंधूंना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले गेले आहे. ते पुढे म्हणाले, पत्रकारांनी ज्याप्रमाणे आज तीन असामान्यांचा सत्कार केला, हे वाखाणण्याजोगे आहे, आजकाल सेलिब्रेटी आणि राजकारण्यांच्या बातम्या त्वरित घेतल्या जातात, पण त्या देतानाही तळागाळातल्या माणसाच्या ही कौतुकाच्या बातम्या छापून त्यांना प्रोत्साहन द्या, असे भावनिक आवाहन प्राचार्य भगवान माळी यांनी केले.
सोहळ्याचे प्रास्ताविक करताना पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी महासंघातर्फे मागील एक वर्षात कोरोनाचा कालखंड असतानाही वृक्षारोपण, आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप, कुष्ट रुग्ण बांधवांना खाऊचे वाटप, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर यासारखे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आवर्जून आपल्या सहकारी पत्रकार बांधवांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले असून कार्यक्रम यशस्वी झाल्याचे समाधान व्यक्त केले.
यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष तथा दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक घोसाळकर, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी तथा सचिव मयूर तांबडे, आर्या प्रहरचे संपादक तथा खजिनदार सुधीर पाटील, दैनिक रामप्रहरचे प्रतिनिधी तथा प्रसिद्धीप्रमुख नितीन देशमुख, दैनिक मुंबई चौफरचे प्रतिनिधी अरविंद पोतदार, दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम, रायगड शिव सम्राटचे प्रतिनिधी सुभाष वाघपंजे, दैनिक सकाळचे प्रतिनिधी के. सी.सिंग, दैनिक कृषिवलचे प्रतिनिधी राजेश डांगळे, दैनिक किल्ले रायगडचे प्रतिनिधी प्रदिप वालेकर, दैनिक रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघोडे, वतन कर्नाळाचे प्रतिनिधी चंद्रशेखर भोपी, दैनिक पुढारीचे प्रतिनिधी राज भंडारी, जनसभाचे संपादक अप्पासाहेब मगर, लोकशाही न्यूजच्या प्रतिनिधी आकांशा देशमुख, आवाज टूडेचे प्रतिनिधी कुणाल जेटपाल, प्रा. बापू महाजन, पॉवर लिफ्टींग कोच अरुण पाटकर, सृष्टी कॉम्प्युटरचे संचालक अक्षय वर्तक, रिया कुलये, गार्डन हेल्थ क्लबचे मोतीराम ठाकूर, अनिल रावराणे, शशिकांत पवार, खुटले गुरुजी, पी.बी.पाटील, प्रदिप शिंदे, के. एन.पाटील, दत्तात्रेय पैलकर यांच्यासह शालेय शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.