महापालिका द्वारे खारघर मधील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई..
महापालिका द्वारे खारघर मधील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः पनवेल महापालिकेच्या क्लीन मार्शल पथकाने खारघर मधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करुन पदपथ मोकळे केल्याने खारघर मधील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
खारघर मधील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुन चालावे लागत आहे. खारघर मध्ये पनवेल महापालिकेचे अतिक्रमण पथक आहे. मात्र, या अतिक्रमण पथकाकडून खारघर आणि तळोजा परिसर मोठा असल्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर योग्य प्रकारे कारवाई केली जात नाही. खारघर मध्ये ‘सिडको’ने फेरीवाल्यांसाठी भूखंड उपलब्ध करुन देखील बहुतांश फेरीवाले पदपथ अडवून व्यवसाय करीत असल्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी खारघर मधील नागरिकांकडून केली जात होती. दरम्यान, पनवेल महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र्य एजन्सीची नेमणूक केली आहे. नव्याने नेमणूक केलेल्या क्लीन मार्शल पथकाने महापालिका खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर सेक्टर- 7, 11, 12, 18, 19 आदी भागात पदपथावर व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांचे साहित्य जप्त केल्याने अनधिकृत फेरीवाले धास्तावले आहेत महाराष्ट्र राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन या ‘कोरोना’च्या नव्या व्हेरीएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 10 जानेवारी पासून कठोर निर्बंध लागू केले असून, हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री दहा वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, खारघर मध्ये हॉटेल, चायनीज गाड्या सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने पनवेल महापालिका आणि खारघर पोलीस प्रशासनाने मोहीम राबवून दोन दिवसात रात्री 10 नंतर जमावबंदी कायदा मोडणार्‍या हॉटेल आणि खाद्यपदार्थ विव्रेत्या रेस्टॉरंटवर कारवाई करुन 67,700 रुपये दंड वसूल केल्याने हॉटेल मालकांचे धाबे दणाणले आहेत.

फोटो ः महानगरपालिकेची कारवाई


Comments